अकोला: गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असणाºया भाजपच्या कार्यकाळात शहर बस वाहतूक सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. सत्ताधारी भाजपने मोठा गाजावाजा करून अकोलेकरांच्या सुविधेसाठी शहर बस सेवा सुरू केली. दुसरीकडे परवाना नसलेल्या आॅटो चालकांनी शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला असून, त्याचा परिणाम शहर बस वाहतुकीवर झाल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून ही सेवा तोट्यात सुरू असल्याची माहिती आहे. उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ जुळवणे संबंधित कंपनीला शक्य होत नसल्यामुळे गुरुवारपासून सिटी बस सेवा बंद करण्यात आल्याचे समोर आले. सत्ताधारी भाजपच्या दुर्लक्षामुळे ही सेवा बंद झाल्याचे बोलल्या जात आहे.मनपाची स्थापना झाल्यानंतर २००४ मध्ये तत्कालीन सत्ताधारी भाजप-शिवसेनेने शहरात पहिल्यांदा बस सेवेची मुहूर्तमेढ रोवली होती. या बस सेवेला २०१३ पर्यंत घरघर लागली आणि भंगार झालेल्या बसेसला अपघात होण्याच्या भीतीने तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस-भारिप-बमसंने ही बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुमारे चार वर्ष सिटी बस बंद होती. २०१४-१५ मध्ये मनपात सत्तापरिवर्तन होताच पुन्हा भाजपने सिटी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी श्रीकृपा ट्रॅव्हल्ससोबत ३५ सिटी बसचा करार केला. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच बसेस सुरू करण्यात आल्या. जानेवारी २०१८ मध्ये आणखी १५ बस शहरात दाखल झाल्या. सद्यस्थितीत २० पैकी १८ बस शहरात धावत आहेत. शहराच्या कानाकोपºयात परवाना नसलेले असंख्य आॅटो धावत आहेत. त्यांच्यावर शहर वाहतूक शाखेचा कोणताही वचक नसल्याचा परिणाम महापालिकेच्या बस सेवेवर झाला आहे. आॅटो वाहनांमुळे सिटी बस सेवेला अकोलेकरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले असून, यामुळे कंपनीचे दिवाळे निघाल्याचे बोलल्या जात आहे. चालक-वाहकांचे वेतन करणेही अवघड झाल्यामुळे श्रीकृपा ट्रॅव्हल्सच्यावतीने गुरुवारी बस वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.आॅटो चालकांचा बंदोबस्त का नाही?शहरात विनापरवाना आॅटो वाहनांची संख्या ३ हजार पेक्षा अधिक असून, याव्यतिरिक्त ग्रामीण भागातील आॅटोंची संख्या वेगळी आहे. यासंदर्भात सत्ताधारी भाजप व प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा होत नसल्यामुळे शहर बस सेवा डबघाईस आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महापौर विजय अग्रवाल यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.