शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेला सन २०१२-१३ मध्ये १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्राप्त निधीतून डांबरीकरणाचे १८ रस्ते प्रस्तावित केले होते. दरम्यान, तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ‘वर्किंग एस्टीमेट’मध्ये बदल करून अठरा फूट रुंद रस्ते चाळीस फूट रुंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच यापैकी सहा प्रमुख रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी शासनाकडून घेण्यात आला. स्थानिक ‘आरआरसी’ कन्स्ट्रक्शनला सिमेंट रस्त्यांची कामे देण्यात आली. २०१६ मध्ये ही कामे सुरू केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच सिमेंट रस्त्यांचे पितळ उघडे पडले. रस्ता तयार झाल्यानंतर लगेच ठिकठिकाणी भेगा पडून तडे गेले. तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे समोर आले.
चौकशी केली; अहवाल धूळखात
तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या अहवालावर कारवाई न करता तत्कालीन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’मार्फत रस्त्यांची पुन्हा चाैकशी करण्याचा निर्णय घेतला. ‘व्हीएनआयटी’च्या वतीने प्रा. फैसल व त्यांच्या चमूने चार रस्त्यांचे एकूण ३९ नमुने घेतले. त्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये रस्त्याच्या निर्माण कार्याविषयी चौकशी केली. याचा अहवाल ‘व्हीएनआयटी’कडे धूळखात पडला असून, मनपाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
‘ऑडिट’मध्ये रस्ते निकृष्ट दर्जाचे
शहरातील सहा रस्त्यांपैकी चार सिमेंट रस्ते मनपाच्या वतीने व उर्वरित दोन रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आले. या सर्व रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ‘ऑडिट’मध्ये उघडकीस आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सिमेंट रस्त्यांची तपासणी करून चौकशी अहवाल मनपाकडे सादर केला होता, हे विशेष.
२०१६ पासून शहरात तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ३० वर्षांचे आयुर्मान असलेल्या रस्त्यावर अवघ्या सहा महिन्यांतच खड्डे पडले आहेत. यामुळे अकाेलेकरांना प्रचंड वेदना हाेत आहेत.
- रवि शिंदे, समाजसेवक
खड्ड्यांमुळे शहरातील सिमेंट रस्त्यांची चाळण झाली असून यामुळे नागरिकांना पाठीचे मणके व हाडांचे विविध आजार जडत आहेत. नरक यातना आणखी किती वर्ष सहन करायच्या, असा सवाल असून यावर लाेकप्रतिनिधी व मनपाने खुलासा करावा.
- अभिषेक खरसाडे, नागरिक
माेठा गवगवा करून राजकारण्यांनी सिमेंट रस्त्यांचे उद्घाटन केले. आता त्यावर खड्डे पडले असताना सर्वांनी चुप्पी साधली आहे. खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांचे हाल हाेत आहेत. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत.
- प्रवीण शिंदे, नागरिक
मनपा व ‘पीडब्ल्यूडी’मार्फत तयार करण्यात आलेले शहरातील सर्व सिमेंट रस्ते निकृष्ट दर्जाचे ठरले आहेत. रस्त्यांसाठी शासनाकडून निधी खेचून आणणाऱ्या लाेकप्रतिनिधींनी का चुप्पी साधली, हा संशाेधनाचा विषय आहे. खिसे जड करण्याच्या नादात अकाेलेकरांच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
- पराग गवई पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडी