आशिष गावंडे, अकाेला: शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्यांचे निर्माण केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत खड्डयांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याचे सचित्र वृत्त ‘लाेकमत’मध्ये गुरुवारी प्रकाशित झाल्यानंतर उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेने आंदाेलनाचे हत्यार उपसले. या रस्त्यातून वाट काढताना महाविद्यालयीन विद्यार्थीनींसह महिलांना अपघाताला सामाेरे जावे लागत असल्याचा आराेप करीत सेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात मुख्य पाेस्ट ऑफीस ते सिव्हील लाइन चाैक मार्गावर रास्ताराेकाे आंदाेलन करण्यात आले. सेनेच्या रास्ताराेकाे आंदाेलनामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
महापालिका प्रशासनाने सन २०१७ मध्ये २२ काेटी रुपयांतून शहरातील प्रमुख चार सिमेंट काॅंक्रीट रस्त्यांचे निर्माण केले. अवघ्या सहा महिन्यांत चारही सिमेंट रस्त्यांवर जागाेजागी खड्डे पडल्यामुळे महापालिका वादाच्या भाेवऱ्यात सापडली. याप्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी ‘साेशल ऑडिट’च्या माध्यमातून रस्त्यांची गुणवत्ता तपासली असता चारही सिमेंट रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचा अहवाल समाेर आला.
प्राप्त अहवालानुसार मनपा प्रशासनाने दाेषी अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराविराेधात कारवाइ तर साेडाच,मागील पाच वर्षांच्या कालावधीपासून रस्त्यांची दुरुस्तीही केली नाही. या रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात महाविद्यालयीन विद्यार्थीनी व महिलांचे अपघात झाले आहेत. यासंदर्भात गुरुवारी ‘लाेकमत’मध्ये सचित्र वृत्त उमटताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हील लाईन रस्त्यावर रास्ताराेकाे आंदाेलन करण्यात आले. आंदाेलनात शहर प्रमुख (अकाेला पश्चिम) राजेश मिश्रा, शहर प्रमुख (अकाेला पूर्व) राहुल कराळे, उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरमकार, युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर,माजी नगरसेवक गजानन चव्हाण, शरद तूरकर , माजी नगरसेविका देवश्री ठाकरे, देवा गावंडे, सुरेंद्र विसपुते , अविनाश मोरे , बंडू सवई , किशोर ठाकरे, अनिल परचुरे , मनीष मोहोड, छोटू धुर्वे , ललित मिश्रा, अमित भिरड, आशुतोष शेगोकार, राजेश इंगळे ,रवी मडावी, विशाल घरडे, शैलेश इंगळे , संजय अग्रवाल, प्रमोद धर्माळे, निवृत्ती तिजारे, महिला आघाडी सुनीता श्रीवास, सीमा मोकळकर ,पूजा मालोकार , सतिष नागदिवे, प्रकाश वानखडे, राजेश खानापुरे, गजानन पाल, बाळू ढोले यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी होते.
बांधकाम विभागातील अभियंता सैरभैर
शिवसेनेने सर्वाधिक वर्दळीच्या सिव्हील लाइन राेडवर रास्ताराेकाे केल्याची माहिती महापालिकेला सिव्हील लाइन पाेलिसांकडून देण्यात येताच बांधकाम विभागातील संबंधित अभियंता, उपअभियंता सैरभैर झाल्याची माहिती आहे. उपअभियंत्यांनी जबाबदारी झटकत क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलली. अखेर कार्यकारी अजय गुजर यांनी आंदोलन स्थळी जावे लागले. येत्या तीन ते चार दिवसांत सिमेंट रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता गुजर यांनी दिले.
शिवसैनिकांनी रुग्णवाहिकेला दिली वाट
शिवसैनिकांनी शहरातील अत्यंत वर्दळीच्या सिव्हिल लाईन रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी एका रुग्णाला घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेला पाहताच शिवसैनिकांनी रुग्णवाहिकेला वाट करून दिली.