अकोला: उन्हाळ्यात शहराच्या परिसरातील पाणवठे कोरडे पडू लागले आहेत. यावर्षी पाणवठ्यांवर हिवाळ्यात अनेक द्विजगणांनी तोकड्या संख्येने हजेरी लावली होती. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही पाहुणे मंडळी परतीचा प्रवास करतात, काही येथेच रेंगाळतात तर टप्याटप्याने परततात. ठिपकेदार सुरमासारखे काही दुर्मिळ पक्षी सध्या कोरड्या पडत जाणाऱ्या पाणवठ्यांवरील चिखलात पक्षीमित्रांना दर्शन देत आहेत.
आनंदाच्या व्याख्या व्यक्तीगणिक वेगवेगळ्या असतात. विविध छंद जोपासुन त्यातुन आनंद अनुभवायची प्रत्येकाची आपली आगळीवेगळी शैली असते. अनेक छंदांपैकी पक्षी निरिक्षणाचा छंदही असाच आनंददायी आहे. शहरातील काही पक्ष मित्र नित्य नेमाने शहरालगतच्या पाणवठ्यांना भेटी देऊन पक्षी निरीक्षणाचा आगळावेगळा छंद जोपासतात. हिवाळ्यात मोठ्या संख्येने आढळणारे बहुतांश स्थलांतरित पक्षी त्यांच्या मुळ अधिवासात परत गेले आहेत. परंतु, काही पक्षी अजुनही पाणवठ्यांच्या चिखलात आढळून येत आहेत. ठिपकेदार सुरमा हा त्यापैकीच एक पक्षी ठिपकेदार सुरमा असे मराठीतील गमतीदार नाव तर Spotted Redshank हे इंग्रजी नाव असलेले चिखले पक्षी कापशी, कुंभारी,मोर्णा धरण,डॉ.पं.दे.कृषी विद्यापीठ परिसरातील पाणवठ्यांवर चिखल्यांचा वावर आहे.
शहरातील ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांना गुरुवारी ठिपकेदार सुरमा पक्ष्यांच्या हालचाली आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या. यावेळी त्यांच्यासोबत हंसराज मराठे, डॉ.अतुल महाशब्दे, राजेश जोशी आदी मंडळी होती. तापणाऱ्या उन्हातील पक्षीमित्रांची ही भटकंती ठिपकेदार सुरमाच्या दर्शनाने सत्कारणी लागल्याची भावना दीपक जोशी यांनी व्यक्त केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"