अकाेला : मोदी सरकारच्या काळात इंधन दरवाढीने उच्चांक गाठलेला आहे. त्यामुळे मोदी सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष असून, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे ह्यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम ११ ते १५ एप्रिलदरम्यान सुरू आहे. या माेहिमेत अकोल्यातून ३ लाख स्वाक्षऱ्या पाठविणार असल्याची माहिती प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या व विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे. युवक काँग्रेसचे राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी इंधन दरवाढीविरोधात, पेट्रोल पंप, बाजार पेठ, गर्दिचे ठिकाण इ. ठिकाणांवरून नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणार आहेत. १ कोटी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांना सोपविण्यात येणार असून, त्यासाठी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश गणगणे, शहर अध्यक्ष अंशुमन देशमुख, प्रदेश महासचिव सागर कावरे, प्रवक्ते कपिल ढोके, सचिव विवेक गावंडे, निनाद मानकर ह्यांच्यासह विधानसभा व जिल्हास्तरावरील कार्यकर्ते काम करीत असल्याचे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.
काेट
अकोट - मूर्तिजापूर, बाळापूर, अकोला पूर्व व पश्चिम ह्या पाचही विधानसभा मतदारसंघांत युवक काँग्रेस कार्यकर्ते स्वाक्षऱ्या गोळा करीत आहेत.
कपिल ढाेके,
प्रवक्ता युवक काँग्रेस