अकाेला : ‘लाेकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच ‘लाेकमत’ अकाेला आवृत्तीचा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती साेहळा आज शनिवार, १० जून राेजी आयाेजित करण्यात आला असून राज्यपाल रमेश बैस या साेहळ्याचे मुख्य अतिथी आहेत. रिधाेरा राेडवरील हाॅटेल जलसा येथे सकाळी ११ वाजता हा साेहळा आयाेजित केला आहे. साेहळ्याला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार प्रमुख अतिथी आहेत. लाेकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन डाॅ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत, लाेकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली हा साेहळा हाेत आहे. वऱ्हाडातील अकाेला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील प्रश्नांना वाचा फाेडण्यासाठी सुरू झालेल्या अकाेला आवृत्तीने अल्पावधीतच वाचकांच्या पाठबळावर यशस्वीतेचे शिखर गाठले. या वैभवशाली रौप्य महोत्सवी वाटचालीत वाचक, वार्ताहर, वितरक व हितचिंतकांचे उदंड प्रेम अन् सहकार्य सामावले आहे. त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच सदर साेहळा हाेत आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा जन्मशताब्दी वर्षातच ‘लोकमत’ची मातृ संस्था नागपूर आवृत्तीचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. त्यापाठोपाठ अकोला आवृत्तीचाही रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा होत आहे, हा दुग्धशर्करा याेग आहे. यावेळी पश्चिम वऱ्हाडातील विविध तालुके व जिल्ह्यातील गत २५ वर्षांतील प्रगतीचा आढावा घेणाऱ्या ‘पंचविशी’ या विशेषांकाचे तसेच विविध क्षेत्रांतील महिलांच्या कर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या ‘वुमन ॲचिव्हर्स अवाॅर्डस्!’च्या काॅफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल व मान्यवरांच्या हस्ते हाेणार आहे.
वऱ्हाडातील मान्यवरांचा हाेणार सन्मानवऱ्हाड प्रांतातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेची नाममुद्रा उमटविणाऱ्या प्रख्यात प्रबाेधनकार सत्यपाल महाराज, आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, साहित्यिक पद्मश्री ना.चं.कांबळे, सहकार क्षेत्रातील अग्रणी राधेश्याम चांडक, माजी राज्यमंत्री अझहर हुसेन, कृषी संशाेधक डाॅ. विलास खर्चे, महिला बाॅक्सर साक्षी गायधने, उद्याेजक सिद्धार्थ रुहाटीया यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात येणार आहे.