अकोला : वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे आयोजित ‘विदर्भ केसरी’ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अकोल्याचा महिला कुस्तीपटूंचा बोलबोला दिसून आला. या स्पर्धेत महिलांमधून ओपन गटात शहरातील संत गाडगेबाबा व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाची साक्षी माळी हिने अतिशय चुरशीच्या सामन्यात रौप्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत ती उपविजेती ठरली.
देवळी येथे पुरुषांसह महिलांच्याही कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील महिला कुस्तीपटूंनी अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन करून पदके प्राप्त केली आहेत. ‘विदर्भ केसरी’साठी साक्षी गणेश माळी हिचा सामना नागपूर येथील कल्याणी पोहारे हिच्याशी रंगला होता. अतिशय चुरशीच्या सामन्यात साक्षीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आतापर्यंत जिल्ह्यातील विदर्भ केसरी स्पर्धेत महिलांमधून रौप्यपदक प्राप्त करणारी साक्षी पहिली मल्ल ठरली आहे. स्पर्धेमध्ये शहरातील संत गाडगेबाबा व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या कुस्तीपटूंनी चांगले प्रदर्शन केल्याने त्यांचा सत्कार होत आहे.
११ वर्षाच्या आस्थानेही पटकाविले ब्रॉन्झ
देवळी येथे आयोजित विदर्भ केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ११ वर्षीय आस्था सिरसाट यांनी ४० किलो वजन गटात ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले आहे. तसेच प्रेरणा विष्णू अरुडकर हिने कांस्य, कविता राजेश राठोड हिने सिल्व्हर, वैष्णवी सूर्यवंशी हिने ४० किलो वजनगटात सिल्व्हर मेडल प्राप्त केले.
सन २००९ पासून कार्यरत असलेल्या संत गाडगेबाबा व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या कुस्तीपटूंनी आतापर्यंत ८५ च्या वर मेडल प्राप्त केली आहेत. विदर्भ केसरी स्पर्धेत मुलींमधून प्राप्त केलेले यश भूषणीय आहे.
- राजेंद्र गोतमारे, वस्ताद तथा जिल्हाध्यक्ष, कुस्तीगीर संघटना.