फळबागांची काळजी घ्या
अकोला: बदलत्या वातावरणात फळबागांची काळजी घेण्याबाबत डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे. संत्रा मृग व आंबिया बहाराच्या झाडाना बांबूचा आधार द्यावा व फळबागेचे वादळी वाऱ्यापासून संरक्षण करावे. आंबिया बहाराच्या वेळी जीब्रालिक आम्ल १ ग्रॅम आणि युरिया १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, यामुळे बहार चांगल्या प्रकारे येण्यास मदत होते. जमीनीनुसार ७ ते १० दिवसाच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने नियमित पाणी द्यावे. ठिबक सिंचन संच असल्यास १ ते ४, ५ ते ७ व ८ वर्षावरील झाडांना अनुक्रमे ९ ते ४०, ६० ते ९६ व १०८ ते १३७ लिटर प्रती दिवस पाणी द्यावे, असे तज्ज्ञ सांगतात.
मास्क, सॅनिटायझरच्या मागणीत वाढ
अकोलाः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात सॅनिटायझर आणि मास्क या दोन सुरक्षा साधनांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे कापडी मास्क आणि सॅनिटायझर आदी सुरक्षा साधनांच्या विक्रीसाठी शहराच्या विविध भागात विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला दुकाने मांडली आहेत.
शहरात माठ विक्रीला
अकोला: उन्हाळ्याच्या तोंडावर शहरात विविध भागात मातीचे माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. मूर्तिजापूर रोड, गौरक्षण रोड, कौलखेड रोडवरील विक्रेत्यांकडे विविध स्वरुपातील माठ उपलब्ध असून महिन्याच्या अखेरीस मागणीत वाढ होणार असल्याचे विक्रेते सांगतात. तर दुसरीकडे वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाही व्यवसायावर पाणी फेरेल का ? अशी भिती व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.
लिंबाचे दर कडाडले
अकोलाः गेल्या काही दिवसांपासून लिंबाचे दर वाढले असून दोन ते तीन रुपये प्रतिनग प्रमाणे लिंबाची किरकोड बाजारात विक्री होत आहे. सद्यस्थितीत बाजारात आवक कमी असल्याने भाव वाढले आहेत. मात्र उन्हाळ्यात शितपेय विक्रेते आणि रसवंती व्यावसायिकांकडून मागणी वाढणार असल्याने आवकेतही वाढ होणार असल्याचे विक्रेते सांगतात.