अकोला : ‘एचआयव्ही’सह जगणाऱ्या बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘सिंगल विंडो’ उपक्रम राबविण्यात आला. यांतर्गत ५० एचआयव्हीग्रस्त बालकांचे बँक खाते उघडण्यात आले असून, या माध्यमातून त्यांना विविध योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.जिल्ह्यात जवळपास ३,९३८ रुग्ण एचआयव्हीशी लढा देत आहेत. एचआयव्हीचे औषध घेताना आर्थिक दृष्ट्या रुग्ण कमकुवत होत जातात. अशा रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ देणे म्हणजे एक आव्हान आहे. एचआयव्हीग्रस्त असल्याचे समाजाला कळेल, या भीतीने बहुतांश रुग्ण समोर येण्यास टाळतात. त्यात विविध योजनांसाठी असलेल्या क्लिष्ट प्रक्रियांना सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांनी एचआयव्हीग्रस्त चिमुकल्या रुग्णांसाठी ‘सिंगल विंडो’ म्हणजेच एक खिडकी योजना राबविण्यात आली. यांतर्गत एचआयव्हीसह जगणाºया ज्या बालरुग्णांच्या आई-वडिलांचे छत्र हरविलेले आहे. अशा सूर्योदय बालगृहातील ५० बालकांचे बँक खाते उघडून देण्यात आले. गतवर्षी एचआयव्हीसह जगणाºया रुग्णांना विहान संस्थेमार्फत एकाच ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून ही सेवा पुरविण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, सूर्योदय बालगृहाचे अधीक्षक शिवराज पाटील, राष्ट्रीयीकृत बँकेचे व्यवस्थापक राकेश कुमार व बाळकृष्ण पातोडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन फरताडे, ज्ञानेश्वर भेंडेकर, योगेश पोतदार व दर्शन जनईकर यांनी प्रयत्न केले.