अकोला : अकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणू उद्रेकाची साखळी तोडण्यासाठी शनिवारी आणि रविवारी कडक संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, या संचारबंदीलाही न जुमानता काही महाभाग रस्त्यांवर अकारण फिरताना आढळून आले, तर काहींनी कोविड नियमांचे उल्लंघन करीत दुकाने उघडल्याचेही समोर आले. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली.
अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील अकोला शहर कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र ठरत असतानाच, शहरातील काही जण लॉकडाऊनमध्येही अकारण फिरत असल्याचे पोलीस कारवाईत समोर आले. पोलिसांनी विविध चौकांत नाकाबंदी करीत कारवाई केली. त्यावेळी अनेकांनी एकसारखीच कारणे सांगितली. त्यावेळी आणलेले औषध आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीबाबत विचारणा केली असता, अनेकांनी आपली चूक कबूल करीत निमूटपणे दंडाचा भरणा केला. या कारवाईदरम्यान काही जण चक्क विनामास्कही आढळून आले. मोहम्मद अली रोडवरील काही दुकाने उघडी होती, तर सिंधी कॅम्पमधील दुकाने उघडी असल्याने नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले.
-----------------------------------------
बाहेर येण्याची कारणे सारखीच!
शहरातील मुख्य बाजारपेठेत काही दुकाने उघडी होती, तर इन्कम टॅक्स चौकातील मोबाइलचे शॉपी उघडी असल्याचे दिसून आले. या सोबतच मोहम्मद अली रोडवर बहुतांश दुकाने उघडी असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले. यावेळी पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांना हटकले असता, त्यांनी साहेब दवाखान्यात जात आहे, दवाखान्यात डबा पोहोचविण्यासाठी जात आहे, औषध आणण्यासाठी जात आहे, अशी एकसारखी कारणे सांगत असल्याचे पोलीस कारवाईदरम्यान समोर आले.
----------------------
शनिवारी ७१ जणांवर कारवाई
शनिवारी लॉकडाऊनदरम्यान शहर पोलिसांनी ७१ जणांवर कारवाई केली. शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध वाहनांची, तसेच अकारण फिरणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी हजार दंड वसूल करण्यात आला.
-------------------
रविवारी ७८ जणांवर कारवाई
रविवारी दुकाने उघडी ठेवणाऱ्यांसोबतच रस्त्यावर अकारण फिरणाऱ्या ७८ जणांना शहर पोलिसांनी लक्ष्य केले. यावेळी ७८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याच वेळी काही जणांना पोलिसांनी सौम्य स्वरूपात काठीचा प्रसादही दिला.
---------------------------------
शनिवार आणि रविवारी कडक संचारबंदी दरम्यान अनेक जण अकारण फिरत असल्याचे आढळून आले. अकारण फिरणाऱ्या १४९ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांनी दिलेली कारणे एकसारखीच होती. अनेक जण स्पष्ट खोटे बोलत असल्याचेही यावेळी आढळून आले.
- सचिन कदम, शहर पोलीस उपअधीक्षक, अकोला