हिवरखेड/ सिरसोली : नजीकच्या सिरसोली येथील गजानन इंगळे आत्महत्या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.सिरसोली येथील महिलेचा विनयभंगप्रकरणी गजानन इंगळेसह तीन जणांना हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी २१ जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते. याच प्रकरणात २३ जून रोजी सदर महिलेच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी आरोपी इमरान अली याच्याविरुद्ध भादंवि ३५४ (अ), (ब) कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. या आरोपींना नंतर २६ जून रोजी अटक केली व त्यांची जामिनावर सुटका झाली. यादरम्यान गजानन इंगळे यांनी २४ जून रोजी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा २८ जून रोजी मृत्यू झाला. मृतकाची पत्नी सुनंदा गजानन इंगळे हिने दिलेल्या फिर्यादीवरून कलम ३०६, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्याच्या दिवसापासून या प्रकरणातील आरोपी मोबीनअली, इमदादअली, सबदरअली हे पसार झालेले आहेत. हिवरखेड पोलीस या तीनही आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार या प्रकरणात गजानन इंगळेसह तिघांची जबानी घेण्यात आली नाही. मृतक गजानन इंगळे यांची मृत्यूपूर्व जबानी घेणे आवश्यक असताना ती जबानीही घेण्यात आली नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे सिरसोली येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात तत्कालीन ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्यावर कारवाई व दोषी आरोपींना अटक करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत. याबाबतचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी मनवरे यांना देण्यात आले आहे.
सिरसोलीत कडेकोट पोलीस बंदोबस्त !
By admin | Published: June 30, 2017 8:07 PM