अकोला, दि. ४- महानगरपालिका निवडणुकीसाठी भारिप-बहुजन महासंघाकडे उमेदवारीचा दावा करणारे सहा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपामध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर या सहा उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्जही दाखल केले.भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून पक्षाच्या ६१ उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये भारिप-बमसंची उमेदवारी मिळाली नसल्याने पक्षाचे रवि विष्णुपंत मेश्राम, विनोद टोबरे, अजय माणिकराव इंगोले, नालंदा महादेव शिरसाट व जयेंद्र धर्माजी वानखडे इत्यादी पाच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले, तर आम्रपाली सिद्धार्थ उपर्वट भाजपामध्ये दाखल झाल्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारिप -बमसंचे रवि विष्णुपंत मेश्राम यांना प्रभाग क्रमांक २-अ मधून, विनोद टोबरे यांना प्रभाग क्रमांक ३ मधून, अजय माणिकराव इंगोले यांना प्रभाग क्रमांक १९ -अ मधून , नालंदा महादेव शिरसाट यांना प्रभाग क्रमांक १६ -अ मधून आणि जयेंद्र धर्माजी वानखडे यांना प्रभाग क्रमांक १४ -अ मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली, तसेच प्रभाग क्रमांक १६ -अ मधून भारिप-बमसंच्या आम्रपाली सिद्धार्थ उपर्वट यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.त्यानुसार भारिपच्या पाच उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून आणि एका उमेदवाराने भाजपाचे उमेदवार म्हणून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. महानगरपालिका निवडणुकीत भारिप-बमसंचे संबंधित सहा उमेदवार पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक होते; मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी मिळाली नसल्याने, भारिप-बमसंच्या पाच उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची आणि एका उमेदवाराने भाजपाची उमेदवारी मिळवून, उमेदवारी अर्ज दाखल केले.
‘भारिप’चे सहा दावेदार, राष्ट्रवादीसह भाजपच्या दारात!
By admin | Published: February 05, 2017 2:45 AM