लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी सोमवार, १ जूनपासून सहा दिवस अकोला शहरात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. कोरोना विषाणूचा अकोला शहरात वाढता संसर्ग आणि पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार गोवर्धन शर्मा, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार नितीन देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, महापौर अर्चना मसने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.कोरोना विषाणूचा अकोला शहरात वाढता संसर्ग आणि पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात उपस्थित लोकप्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सूचना मांडल्या. त्यानुसार कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला शहरात १ ते ६ जून असे सहा दिवस ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार असून, या संपूर्ण ‘लॉकडाउन’च्या कालावधीत शहरातील वैद्यकीय सेवा वगळता, इतर सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री बच्चू कडू यांनी सर्वपक्षीय बैठकीत केली. ‘जनता कर्फ्यू’च्या कालावधीत शहरातील कोणताही गरीब व्यक्ती उपाशी राहणार नाही, यासंदर्भात उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले.शासन व पालकमंत्र्यांच्या आदेशात विरोधाभासराज्यशासनाने लॉकडाउन-४ चे निर्बंध लागू करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या संदर्भात जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांना मुख्य सचिवांच्या मंजूरीशिवाय कोणताही बदल करता येणार नाही, असे स्पष्ट केले. अकोल्यात पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण लॉकडाउन करणे म्हणजे, शासन आदेशाची अवहेलना ठरु शकते.
अकोल्यात सहा दिवस ‘जनता कर्फ्यू’! पाळण्याची पालकमंत्र्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 9:54 AM