अकोला: शहरातील रस्ते विकासाची गाडी आता रुळावर येऊ लागली आहे. रस्ते विकासासाठी असलेल्या निधीत अतिरिक्त निधी टाकून शहरातील सहा प्रमुख रस्त्यांचे दुभाजकांसह द्विपदरीकरण करण्यात येणार आहे. या कामांना डिसेंबरमध्ये सुरुवात होईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अनेक वर्षांपासून अकोला शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा सामना येथील नागरिक करीत आहेत. बहुतांश प्रमुख रस्त्यांची झालेली अवस्था चिंतेचा विषय आहे. यातून मार्ग काढत महापालिका प्रशासनाने रस्ता विकासासाठी शासनाकडून आलेल्या निधीतून तरतूद केली. त्यात सहा प्रमुख रस्त्यांचाही समावेश होता. या रस्त्यांवरील वर्दळ बघता आणि दीर्घकाळ टिकतील असे रस्ते तयार करण्यासाठी रस्त्यांच्या कामांमध्ये काही बदल जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सुचविले आहे. त्यानुसार सहा प्रमुख रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासोबतच दुभाजकासह हे रस्ते द्विपदरी करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. ही कामे डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सहा प्रमुख रस्ते होणार दुभाजकांसह दुपदरी!
By admin | Published: October 07, 2015 2:10 AM