अकोला: अल्पवयीन मुलीसोबत अश्लील संवाद साधणाºया युवकाविरुद्ध साक्ष व सबळ पुराव्यांमुळे गुन्हा सिद्ध झाल्याने दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी त्याला सहा महिन्यांचा साधा कारावास, दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.माना पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया एका गावातील अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिची अल्पवयीन मुलगी घराच्या दरवाजासमोर उभी असताना, आरोपी पंकज शालीग्राम माहुरे (२३ रा. कुरूम) हा शौचास जात होता. त्यावेळी त्याने मुलीकडे पाहिले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने तातडीने दरवाजा बंद करून स्वत:चा बचाव केला. मुलीची आई घरी आल्यावर झालेला प्रकार तिच्या कानावर घातला. त्यामुळे मुलीच्या आईने माना पोलीस ठाण्यात पंकज माहुरे याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम ११, १२, ३५४(अ) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने सात साक्षीदार तपासले. आरोपीविरुद्ध साक्ष व सबळ पुरावे असल्यामुळे त्याला सहा महिन्यांचा साधा कारावास आणि दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी १५00 रुपये पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी विधिज्ञ मंगला पांडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)