अकोला : पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगवल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या रडारावर आणखी सहा बियाणे कंपन्या असून, त्यापैकी पाच कंपन्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नोटीस बजावल्या आहेत. सोयाबीन उगवलेच नसल्याने जिल्हाभरातून कंपन्यांविरुद्ध तक्रारी येऊ लागल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागातर्फे पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली. बियाण्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच कंपन्यांच्या बियाण्यांची उगवणक्षमता कमी असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार, कृषी विभागाने महाबीजसह वरदान बायोटेक आणि केडीएम सीड्स तसेच मे. सारस अॅग्रो इंडस्ट्रीज व मे. प्रगती अॅग्रो सर्व्हिसेस या कंपनीविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर आणखी सहा बियाणे कंपन्या कृषी विभागाच्या रडारवर आहेत. त्यातील पाच कंपन्यांना कृषी विभागाने नोटीस बजावली आहे.
'त्या' कंपन्यांच्या उत्तराकडे लक्षसंबंधित बियाणे कंपन्यांना नोटीस बजावल्यानंतर कृषी विभागाला पाचही कंपन्यांच्या उत्तरांची प्रतीक्षा आहे. संबंधित कंपन्यांची उत्तरे आली नाहीतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
आतापर्यंत पाच कंपन्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच पाच कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.- मुरलीधर इंगळे,कृषी विकास अधिकारी, जि.प.