बार्शिटाकळी : बार्शीटाकळी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या पिंपळखुटा-गोरवा रस्त्यावरील शेताच्या बाजूस एका तलावानजीक सहा मोर व सात लांडोरींचा मृत्यू झाल्याची घटना रविवार, दि. १६ मे रोजी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे उपवनसंरक्षक के. आर. अर्जुना, सहायक उपवनसंरक्षक सुरेश वडोदे, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळने, वनपरिक्षेत्र अधिकारी डांगे, बार्शीटाकळीचे तालुका पशुधन अधिकारी डॉ. रंजित गोळे, अकोला सर्वचिकित्सालयाच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. वर्षा चोपडे, प्रभारी वनपाल पी. डी. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मृत्युमुखी पडलेल्या राष्ट्रीय पक्ष्यांची शिकार झाली की, अज्ञात आजाराने त्यांचा मृत्यू झाला याचा उलगडा अद्याप झाला नसून, मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
दोन चिमण्या व तीन टिटव्यांचाही मृत्यू
मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांमध्ये सात लांडोर, सहा मोर यांच्यासह तीन टिटव्या, दोन चिमण्यांचाही समावेश आहे. या पक्ष्यांची विषबाधेचा प्रयोग करून शिकार झाली, की, अज्ञात आजारामुळे मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू ही गंभीर घटना असून, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या पक्ष्यांची शिकार झाली असल्यास वन विभागामार्फत कडक पावले उचलली जातील. पक्ष्यांच्या शवविच्छेदनानंतर त्यांचे अवशेष फॉरेन्सिक लॅब हैदराबादला पाठविण्याचे विचाराधीन असून, राष्ट्रीय पक्ष्यांचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, त्यांची शिकार करू नये.
- के. आर. अर्जुना, उप वनसंरक्षक, अकोला.