अकोला: राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांच्या टोळीने ५ डिसेंबर रोजी रात्री धुडगूस घालून ट्रक चालक विनय रॉय (रा. लुधियाना पंजाब) याची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली होती. या प्रकरणात आरोपी दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी बाळापूरपोलिसांनी सहा पथके तयार केली आहेत. ही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रवाना झाली आहेत.गुरुवारी विनय रॉय जगन्नाथ रॉय (४0) हा एचआर-६३ बी-६६५७ क्रमांकाचा ट्रक घेऊन खामगावकडे जात होता. दरम्यान, पारस फाट्याजवळील जम्मू ढाब्यावर तो रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास जेवण करण्यासाठी थांबला. जेवण आटोपल्यानंतर विनय रॉय हा ट्रककडे जाण्यास निघाला असता, पाच ते सहा दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढविला. त्याने आरडाओरड केल्यावर ढाब्यावरील कामगार त्याच्या मदतीसाठी धावले; परंतु दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केली. दरोडेखोरांनी ट्रकमध्ये घुसून साहित्य व काही रक्कम घेतली आणि ट्रकचालक विनय रॉय याला बाजूच्या शेतात नेऊन त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर दरोडेखोरांनी शिवनेरी ढाब्याकडे जात तेथील एकाला चाकूचा धाक दाखवून लुटले आणि दरोडेखोर पळून गेले. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी बाळापूरपोलिसांनी सहा पथके तयार केली आहेत. ही पथके बाळापूरचे ठाणेदार गजानन शेळके यांनी इतर जिल्ह्यांमध्ये पाठविली आहेत. पोलिसांनी विनय रॉय याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे. नातेवाइक त्याचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिकेने लुधियानाला रवाना झाले आहेत. (प्रतिनिधी)
दरोडेखोरांच्या शोधासाठी सहा पोलीस पथके तयार केली आहेत. प्राथमिक तपासामध्ये तीन दरोडेखोर असल्याचे समोर येत आहेत; परंतु आरोपी वाढण्याची शक्यता आहे.- गजानन शेळके, ठाणेदार,बाळापूर पोलीस स्टेशन.