अकोला: जिल्ह्यातील २२४ सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात गुरुवार, ११ फेब्रुवारी रोजी १०८ सरपंचपद व उपसरपंचपदांची निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभांमध्ये जिल्ह्यात १०२ सरपंचांची व १०८ उपसरपंचांची निवड करण्यात आली. सरपंचपदांच्या आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य निवडून आले नसल्याने सहा सरपंचांची पदे रिक्त राहिली. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील एक व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पाच सरपंचपदांचा समावेश आहे.
मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाले. त्यानंतर जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांसाठी दोन टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १०८ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरंपच पदांच्या निवडणुकीसाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभा घेण्यात आल्या. त्यामध्ये जिल्हयातील १०८ पैकी १०२ सरपंचांची व १०८ उपसरपंचांची निवड करण्यात आली. सरपंचपदांच्या प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य निवडून आले नसल्याने जिल्ह्यात सहा सरपंच पदे रिक्त राहिली. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील एक व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पाच सरपंच पदांचा समावेश असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
ग्रामपंचायत व प्रवर्गनिहाय अशी
रिक्त राहिली सरपंचपदे!
तालुका ग्रा.पं. प्रवर्ग
तेल्हारा सौदळा अनुसूचित जमाती
अकोट पातोंडा अनुसूचित जाती
अकोट मंचनूपूर अनुसूचित जमाती(स्त्री)
बाळापूर अंत्री मलकापूर अनुसूचित जमाती
बार्शिटाकळी लोहगड अनुसूचित जमाती
पातूर चतारी अनुसूचित जमाती(स्त्री)
रिक्त सरपंचपदांची संख्या १६!
जिल्ह्यातील २२४ सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९ फेब्रुवारी रोजी ११६ सरपंच व उपसरंपचपदांची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये १०६ सरपंचच व ११६ उपसरंपचांची निवड करण्यात आली. सरपंच पदांच्या आरक्षणानुसार संबंधित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य निवडून आले नसल्याने अनुसूचित जाती दोन व अनुसूचित जमाती प्रवर्गातील आठ अशी दहा सरपंचपदे रिक्त राहिली. तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील एक व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पाच सरपंच पदे रिक्त राहिली. त्यामुळे जिल्ह्यातील २२४ सरपंचपदांच्या निवडणुकीत रिक्त राहिलेल्या सरपंचपदांची संख्या १६ झाली आहे.