अकोला: सहा वर्षांपूर्वी शहरातून अचानक बेपत्ता झालेले एका ड्रायव्हींग स्कूलचे संचालक विनोद सरदार हे मेहकर-लोणार रोडवरील एका ढाब्यावर शुक्रवारी त्यांच्या परिचितांना दिसले; मात्र सरदार यांनी लगेचच तेथून पलायन केले. नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत. विनोद सरदार हे लोहारा परिसरातून सहा वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते. या परिसरात त्यांची मोटारसायकल बेवारस स्थितीत आढळली होती. त्यांचे कपडेसुद्धा या ठिकाणी आढळून आले होते. पोलिसांनी सरदार यांचा कसोशीने शोध घेतला; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरदार यांचे अज्ञात आरोपींनी अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ३६४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या घटनेला सहा वर्ष उलटली; मात्र तरीही सरदार यांचा थांगपत्ता लागला नाही. पोलिसांनासुद्धा या घटनेचा विसर पडला होता. शुक्रवारी अचानक या प्रकरणाला वळण मिळाले. विनोद सरदार यांच्या नातेवाईकांचा चालक कार घेऊन लोणार येथून अकोल्याकडे परतत असताना, तो जेवण करण्यासाठी लोणार-मेहकर रोडवरील शाही नामक ढाब्यावर थांबला. या ठिकाणी त्याची दृष्टी एका व्यक्तीवर पडली. ती व्यक्ती विनोद सरदारच असल्याची त्याची खात्री झाली. त्यानंतर चालकाने सरदार यांच्या नातेवाईकांना याबाबत सूचना दिली. आपली ओळख पटल्याचे लक्षात येताच, त्या व्यक्तीने तेथून पळ काढला. चालकाने पाठलाग सुरू केला असून, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात येत होता. या प्रकरणी पोलिसांनासुद्धा सूचना देण्यात आली आहे. यासंदर्भात आणखी चौकशी केली असता, विनोद सरदार हे काही दिवसांपासून या ढाब्यावर काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी मेहकरातील अन्य काही ठिकाणीही कामधंदा केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सहा वर्षांपासून बेपत्ता ड्रायव्हींग स्कूलचा संचालक आढळला!
By admin | Published: December 05, 2015 9:08 AM