अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी खोजबळ येथील एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करीत त्यांच्या घरात हैदोस घालणाऱ्या पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांच्या न्यायालयाने शनिवारी सहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपींना दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
टाकळी खोजबळ येथील रहिवासी प्रवीण काशीराम साबे व सचिन काशीराम साबे या दोन भावंडांना याच गावातील रहिवासी पुरुषोत्तम दयाराम गाडगे, संतोष दयाराम गाडगे, उमेश दयाराम घाडगे, गोपाल श्रीराम गाडगे व खंडू भाऊराव गाडगे या आरोपींनी घरात घुसून मारहाण केली होती. या हल्ल्यात सचिन साबे व प्रवीण साबे गंभीररीत्या जखमी झाले होते. आराेपींनी लोखंडी पाईप व काठ्यांनी मारहाण केल्याने प्रवीण साबे यांना मोठी दुखापत झाली होती. या प्रकरणी त्यांचे वडील काशीराम साबे यांनी उरळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित पाचही आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १४७, १४८, ३०७, ५०४, ५०६, ४५०, १४९, अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास उरळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार पी. के. काटकर यांनी करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले़ न्यायालयाने आठ साक्षीदार तपासल्यानंतर या प्रकरणातील पाचही आरोपींना विविध कलमान्वये दोषी ठरवीत सहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच दंडही ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने ॲड. आशिष पुंडकर व ॲड. शाम खोटरे यांनी कामकाज पाहिले़ कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून जाकीर हुसेन यांनी सहकार्य केले़
अशी सुनावली शिक्षा
कलम १४७, १४८ सह कलम १४९ अंतर्गत एक वर्षाचा सश्रम कारवास, एक हजार रुपये दंड ठाेठावला. कलम ३०७ अन्वये सहा वर्षांचा सश्रम करावाे व पाच हजार रुपये दंड ठाेठावला. कलम ५०४ व ५०६ अन्वये एक वर्षाचा कारावास व एक हजार रुपये दंड, तसेच कलम ४५० व १४९ अंतर्गत चार वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड अशा प्रकारे शिक्षा सुनावली, तर सचिन साबे व प्रवीण साबे यांना २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.