अकोला, दि. १४ : जिल्हय़ात गत १0 दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला आज निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी गणेश मंडळांनी जोरात केली असून, यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पोलिसांचा हस्तक्षेप नसला तरी या विसर्जन मिरणवुकीसाठी शांतिदूतही कार्यरत राहून गणेश मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.मोठय़ा हर्षोल्हासात आणि वाजतगाजत आलेल्या गणरायाचे विविध कार्यक्रम गत १0 दिवसांपासून सुरू आहेत. लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्वच गणरायाच्या पूजेमध्ये गुंतलेले होते. आता गुरुवारी बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. बाप्पांच्या विसर्जनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी पूर्ण केली आहे, तर ही मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. मानाच्या गणपतीचे पूजन करून सकाळी १0 वाजता या मिरवणुकीस जय हिंद चौक येथून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर शहराच्या विविध भागातून गणरायांची वाजतगाजत मिरवणूक झाल्यानंतर गणेश घाटांवर गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हय़ात तब्बल एक हजार ७७१ गणेश मंडळांची नोंदणी असून, शहरात ६८४ मंडळांची नोंदणी आहे. जिल्हय़ातील ३२0 गावांत ह्यएक गाव, एक गणपतीह्ण असून, ही मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.जय हिंद चौकातून प्रारंभ झाल्यानंतर दगडी पुलावरून रायली जिन, रयत हवेली, टिळक रोड, आकोट स्टॅन्ड, दीपक चौक, हाशम सेठ लायब्ररी पुढे मोहम्मद अली रोड, ताजनापेठ पोलीस चौकी, सराफा बाजार परिसर, कापड बाजार, किराणा बाजार, गांधी चौक आणि सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोरील गणेश घाट या मार्गावर सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक निघणार आहे.मिरवणूक मार्गावरील अडचणीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर प्रचंड खड्डे आहेत, त्यामुळे मोठमोठय़ा गणेश मूर्ती घेऊन येताना भक्तांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या खड्डय़ांसोबतच काही ठिकाणी विसर्जन मार्ग अत्यंत अरुंद असल्याने भाविकांना मूर्ती सांभाळून आणावी लागणार आहे. यासाठी गणेश मंडळांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. काही अनुचित हालचाली सुरू असल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस यंत्रणा दोन दिवसांपासूनच सज्ज असून, यासाठी सर्वांनी जागरूक राहून पोलिसांना सहकार्य करावे.- चंद्रकिशोर मीणापोलीस अधीक्षक, अकोला.
बाप्पांना आज निरोप!
By admin | Published: September 15, 2016 3:13 AM