निहिदा: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत खोपडी-माळशेलू रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्याचे काम थंड बस्त्यात सुरू असून, वाहनचालकांसह ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. कंत्राटदाराने रस्ता पूर्णत: खोदून ठेवल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
परिसरातील खोपडी-माळशेलु रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. रस्त्याचे काम थातूरमातूर होत असल्याने परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत होत असलेला रस्ता कंत्राटदाराने पूर्णत: खोदून ठेवल्याने रस्त्यावर अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गाने प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. कंत्राटदाराने पुलाचे व रस्त्याचे काम करण्यासाठी मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. या खड्ड्यांमध्ये अनेक गुरे पडून जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. तरीही कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मागणी मान्य न झाल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या प्रकरणात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रदीप रामचंद्र राठोड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (फोटो)
---------------------
खोपडी-माळशेलू रस्त्याचे काम अतिशय थंड बस्त्यात असून, निकृष्ट दर्जाचे होत आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्याच्या कामाला गती देत चांगल्या दर्जाचे साहित्य वापरावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.
-सुरेखा भगत, सरपंच, माळशेलू
--------------------------
माळशेलू येथील तक्रारीबाबत मला माहिती नाही. काम संथगतीने सुरू असल्याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
-नितीन नाठक, कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अकोला.