अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३ जवळ स्लॅबचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. महिनाभरातील ही दुसरी घटना असून, यापूर्वी २९ जून रोजी सोनोग्राफी वॉर्डातील एका खोलीच्या स्लॅबचा काही भाग या प्रकारे कोसळला होता. या घटनांमुळे ही इमारत किती धोकादायक आहे, याचा अंदाज बांधता येत असला, तरी प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.जिल्ह्यात सर्वत्र संततधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक जुन्या इमारतींना धोका आहे. अशातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग पुन्हा एकदा कोसळल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. प्राप्त माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर प्रसूती वॉर्ड असून, गर्भवतींसह नवजात बालकांना येथूनच ने-आण केली जाते. शिवाय, याच इमारतीमध्ये इतरही महत्त्वाचे वॉर्ड असून, बहुतांश रुग्ण याच इमारतीमध्ये असतात. त्यामुळे हा प्रकार मोठ्या घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. सुदैवाने दोन्ही घटनेत कोणालाही इजा झाली नाही; परंतु भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डॉक्टर थोडक्यात बचावलेरविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत एक डॉक्टर थोडक्यात बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित डॉक्टर प्रसूती वॉर्डाकडे जात असताना हा स्लॅब अचानक कोसळला. सतर्कतेमुळे डॉक्टर थोडक्यात बचावले.‘स्ट्रक्चर आॅडिट’चा मुहूर्त निघेना...सर्वोपचार रुग्णालयाची इमारत १९१७ मध्ये बांधण्यात आली असून, इमारतीला ९२ वर्षे पूर्ण झाले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे स्ट्रक्चर आॅडिटची मागणी केली होती. यासंदर्भातही गत वर्षभरापासून पत्रव्यवहार सुरू आहेत; मात्र अद्यापही इमारतीच्या स्ट्रक्चर आॅडिटचा मुहूर्त निघाला नाही. यासंदर्भात मुंबई येथील एका महाविद्यालयाला स्ट्रक्चर आॅडिटची मंजुरी दिली असल्याची माहिती आहे. असे असले, तरी यावर कुठल्याच हालचाली न झाल्याने इमारतीच्या स्ट्रक्चर आॅडिटचे भिजत घोंगडे कायम आहे.इमारतीच्या समस्येसोबतच ‘स्ट्रक्चर आॅडिट’संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार पत्रव्यवहार केला आहे. गायनिक विभाग नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे; परंतु त्याला आणखी महिन्याभराचा अवधी आहे. त्यामुळे छत गळतीचा प्रश्न निकाली लागेल.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार