खेट्री: वसाली, झरंडी मार्गावर पुलाच्या बांधकामाऐवजी अरूंद रपट्याचे काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रपट्यावरून जड वाहने जात नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी या कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
स्वातंत्र्यकाळापासून पातूर तालुक्यातील वसाली, झरंडी या गावात जाण्यासाठी ग्रामस्थांना रस्ता नव्हता. त्यामुळे गावात दुचाकी व इतर वाहन गावात जात नव्हते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. अखेर मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली. गत काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले;मात्र वसालीनजीक पुलाचे बांधकाम करणे आवश्यक असताना तेथे केवळ रपट्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रपट्यावरून एस. टी. बस, ट्रक व इतर जड वाहने जाऊ शकत नाही. संबंधित विभागाच्या दुर्लक्षतेमुळे मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेचा बट्ट्याबोळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी संबंधितांकडे वारंवार तक्रार केली, परंतु संबंधितांकडून ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून दखल घेतली गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधीने दखल घेऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्यांशी वारंवार संपर्क केला असता, होऊ शकला नाही.