कोठारी (जि. अकोला), दि. १२- नजीकच्या आस्टुल येथील शेतशिवारात गावाला लागून असलेल्या रवींद्र लक्ष्मण इंगळे यांच्या शेतात त्यांच्या मालकीची गाय ११ मार्च रोजी बिबट्याने केलेल्या हल्लय़ात ठार झाली. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पातूर तालुक्यातील आस्टुल, खानापूर, पास्टुल व कोठारी या परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे गुराखी दीपक घुगे यांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती संबंधित शेतकर्याने वन विभाग पातूर यांना दिली असता, वनपाल एस. यू. वाघ व वनरक्षक वाय.पी. सरकटे यांनी घटनास्थळाला भेट देऊन गायीच्या मृतदेहाचा पंचनामा केला. गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या शेतात बिबट्याने हल्ला केल्यामुळे गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा वनविभागाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. रवींद्र इंगळे यांच्या शेतात वाघाने शिकारी हल्लय़ात ठार केलेल्या गायीचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली.- एस. यू. वाघ, वनपाल, पातूर.गुरे चारण्यासाठी जंगलातील वेगवेगळ्या परिसरामध्ये जावे लागते. अधूनमधून बिबट्या-वाघ या शिकारी प्राण्यांचे दर्शन होत आहे.- दीपक घुगे,गुराखी, आस्टुल.
बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
By admin | Published: March 13, 2017 2:34 AM