अकोला: वऱ्हाडात कोविडची स्थिती नियंत्रणात असली तरी लसीकरणाची गती संथ असल्याचे दिसून येते. पहिल्या डोसच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. अकोल्यात १२ टक्के, वाशिम जिल्ह्यात १३ टक्के लोकांनीच लसीचे दोन्ही डोस घेतले. बुलडाणा जिल्ह्यातही लसीकरणाची गती संथ असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत वऱ्हाडात अकोल्यासह वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यात लसीचा पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या सुमारे ३० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे, मात्र अनेकांनी अद्यापही लसीचा दुसरा डोस घेतला नाही. मध्यंतरी तिन्ही जिल्ह्यात लसीचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणावर प्रभाव दिसून आला. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ९१ हजार ५८३ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ४ लाख ९ हजार ९८९ म्हणजेच सुमारे २९ टक्के आहे, तर १ लाख ७० हजार म्हणजेच सुमारे १२ टक्के लोकांनी लसीचा दुसरा डाेस घेतला आहे. वाशिम जिल्ह्यात ३ लाख ६७ हजार ८७ लोकांनी पहिला (३६.२३ टक्के), तर १ लाख ३१ हजार ७४६ लोकांनी लसीचा दुसरा डोस (१३ टक्के) घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ९ लाख २२ हजार ८४३ लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी ६ लाख ७९ हजार ८४३ लोकांनी लसीचा पहिला, तर २ लाख ४३ हजार ३० लोकांनी लसीचा दुसरा डाेस घेतला आहे. पहिल्या डोसच्या तुलनेत लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. ही स्थिती पाहता वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यांमधील लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे.
अशी आहे तिन्ही जिल्ह्यांची स्थिती
जिल्हा - पहिला डोस - दुसरा डोस - एकूण लसीकरण
अकोला - ४,०९,९८९ - १,८१,५९४ - ५,९१,५८३
बुलडाणा - ६,६९, ८४३ - २,४३,०३० - ९,२२,८४३
वाशिम - ३, ६७,०८७ - १,३१,७४६ - ४,९८, ८३३