अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबतच इतर सवलतपात्र प्रवाशांना स्मार्ट कार्ड बाळगणे येत्या ३१ ऑक्टोबरपासून बंधनकारक होणार आहे. तथापी, गत दोन ते अडीच महिन्यांपासून ठप्प झालेली स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया अद्यापही सुरळीत न झाल्याने दररोज मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक मध्यवर्ती बसस्थानकावरील नोंदणी कक्षापर्यंत येऊन रीत्याहस्ते परत जात असल्याचे चित्र आहे.
गत दोन वर्षांपासून सुरू असलेली कोरोना संसर्गाची स्थिती व एसटी कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यापासून पुकारलेला संप या दोन कारणांमुळे आगार व विभागीय कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे आतापर्यंत वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु हजारो सवलतधारकांनी नव्या स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केलेली नाही. तसेच नोंदणी केलेल्या अनेकांना स्मार्ट कार्ड वितरित झालेले नाहीत.
परिणामी, सवलतधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुदतवाढ मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया बंद पडली आहे. तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी बंद असल्याचा फलकच मध्यवर्ती बसस्थानकावरील कक्षाच्या खिडकीवर लावण्यात आला आहे. जिल्ह्यातील इतर आगरांमध्येही नोंदणी बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना बसस्थानकांवर नाहक येरझारा घालाव्या लागत असल्याचे चित्र आहे.
एसटीचे अधिकारीही अनभिज्ञ
गत अडीच महिन्यांपासून बंद असलेली स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया कधी सुरू होणार याची प्रतीक्षा ज्येष्ठ नागरिकांना लागलेली आहे. राज्य पातळीवरील यंत्रणा एवढे दिवस कशी बंद राहू शकते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनाही नोंदणी प्रक्रिया कधी सुरु होईल, याबाबत सांगता आले नाही.