‘ब्रेक द चेन’अंतर्गत बसेस सुरू होऊनही येथील आगाराला त्याचा मोठा फायदा झाला नाही. त्यातच आता प्रवाशांकडून कमी-जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने काही आगारातून सुटणाऱ्या मध्यम व लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या डिझेल खर्चाचा भार पडत आहे. तरी अकोला जिल्ह्यात सर्वच आगारांत डिझेलचा पुरवठा असल्याने बसफेऱ्या नियमित धावत आहेत.
जिल्ह्यातील आगार आणि असलेल्या बसेस
आगार क्र. १ - २६
आगार क्र. २ - ३०
अकोट - ३५
तेल्हारा - १९
मूर्तिजापूर - १७
नियोजित सर्वच फेऱ्या सुरू
अकोला जिल्ह्यातील पाचही आगारात डिझेलचा व्यवस्थित पुरवठा होत असल्याने प्रत्येक आगाराकडून नियोजित बसफेऱ्या नियमित सोडल्या जात आहेत. काही बसगाड्या मात्र तांत्रिक बिघाडामुळे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. काही बसेस प्रवासी नसल्याने आगारातच उभ्या असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या बसगाड्यांमुळे नियोजित फेऱ्यांवर कसलाही परिणाम झालेला नाही.
सर्वच आगारांना डिझेल पुरवठा
एसटी महामंडळाच्या अनेक आगारांना डिझेल तुटवडा भासत असल्याने बसफेऱ्या रद्द करण्याची वा बसगाड्या आगारातच उभ्या ठेवण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यात मात्र असा कोणताही प्रकार नसून, सर्वच आगारांना दिवसाकाठी आवश्यक प्रमाणात डिझेलचा पुरवठा होत आहे.
डिझेलच्या किमती वाढल्याने फटका!
आधी डिझेलचा दर कमी होता. आता एसटीला ९२ रुपये प्रतिलीटर डिझेल कंपनीकडून थेट खरेदी करावे लागत आहे. डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे २८ रुपयांचा तोटा एसटीला भरून काढावा लागत आहे. डिझेलवर होणाऱ्या खर्चामुळे एसटीला मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे.