- सचिन राऊत
अकोला: जिल्ह्यात गर्भपाताच्या किट्सची विक्री करणारी टोळी मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या पाच राज्यातून गर्भपाताच्या किट्सची अवैधरीत्या तस्करी करीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. यामध्ये सर्वाधिक किट्स मध्य प्रदेश आणि हैद्राबाद येथून आणण्यात येत असल्याचे वास्तव आहे.चवरे प्लॉट येथे गर्भपाताच्या किट्सची विक्री करीत असताना संध्या रमेश चांदेकर आणि तिचा साथीदार संजय धनकुमार जैन या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अकोल्यातील ही आठ जणांची टोळी दवाबाजार आणि त्यासमोरील एका ठिकाणावरून गर्भपाताच्या किट्स विक्रीचा गोरखधंदा चालवित असल्याची माहिती आहे. यामध्ये आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, या प्रकरणातील सेटिंग फिस्कटल्यानंतरच कारवाई झाल्याचीही चर्चा आता जोरात सुरू आहे. गर्भपाताच्या किट्स विक्री प्रकरणात आणखी काहींचा सहभाग असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.विना देयकात आणणे, विना देयकात विकणेगर्भपाताच्या किट्सची खरेदी आणि विक्री करताना संबंधित किट्स कोणत्या डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवर देण्यात आली. कोणत्या रुग्णास देण्यात आली, त्यांचे नाव, गाव, पत्ता आणि डॉक्टरच्याही पूर्ण माहितीचे रेकॉर्ड ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे हे रेकॉर्ड ठेवण्यापेक्षा विना देयकात खरेदी करणे आणि विना देयकात विक्री करणे हा गोरखधंदाच अकोल्यातील टोळीने चालविल्याचे समोर आले आहे.ट्रॅव्हल्समध्ये येतात पार्सलगर्भपाताच्या किट्स अकोल्यात आणण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सचा उपयोग करण्यात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. खासगी ट्रॅव्हल्समध्ये टिकीट बुक करून येताना तस्करांकडून या किट्सचे पार्सल डिक्कीमध्ये ठेवण्यात येते. हे पार्सल ठेवताना सिट क्रमांक चुकीचा सांगण्यात येतो, किंवा काही खासगी ट्रॅव्हल्समध्ये सिट क्रमांक देण्याची गरजच नसल्याने या किट्सची अत्यंत सहज तस्करी करण्यात येत आहे.१० हजारांच्या पार्सलचे होतात २ लाखसदर पाच राज्यातील कोणत्याही मोठ्या शहरातून गर्भपाताच्या १० हजार रुपयांच्या किट्स खरेदी केल्यानंतर ते अकोल्यात विक्री करताना त्याचे तब्बल २ लाख रुपये करण्यात येतात. यामध्ये मोठी कमाई असल्यानेच अनेकांनी त्यांचे हात ओले केल्याचीही माहिती आहे. एखाद्या वेळी सदरचे पार्सल जप्त झाले तरी मोठे नुकसान नसल्याने हा गोरखधंदा फोफावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.