अकोला : बाळापूर तालुक्यातील मोरगाव भाकरे येथील शेताजवळ राहणाऱ्या काही ग्रामस्थांच्या घरांच्या छतावर फिरणारा मानद वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र बाळ काळणे यांनी बुधवारी (१३ जून) रात्री पकडून परिसरातील २० कुटुंबांना भयमुक्त केले.
भला मोठा नाग शेताजवळ राहणाऱ्यांना दररोज दिसून येत होता. त्यामुळे या भागातील २० कुटुंब प्रचंड दहशतीत होते. नागाच्या भीतीने अनेक जण रात्रभर जागायचे. बुधवारी रात्री हा नाग राजू जंजाळ यांच्या घरांवर दिसून आला. त्यांनी तात्काळ सर्पमित्र बाळ काळणे यांना भ्रमणध्वणीवरून माहिती दिली. माहिती मिळताच काळणे तातडीने मोरगाव भाकरे येथे दाखल झाले.
पाहणी केली असता नाग एका भिंतीवर पहुडलेला दिसला. त्यांनी एका पडक्या भिंतीवर चढून नागाला खाली ओढलं. काळोखी रात्र व अत्यंत अडचणीच्या जागेत काळणे यांनी शिताफिने नागाला पकडलं. नाग जेरबंद झालेला पाहून त्या परिसरातील २० कुटुंबांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर हा नाग त्यांनी सुरक्षित अधिवासात सोडला. पावसाळ्यात साप कोरडी जागा शोधतात. शेताजवळ, नदी-नाल्याच्या काठावर राहणाऱ्यांनी या दिवसांत काळजी घ्यावी, अशी माहिती यावेळी बाळ काळणे यांनी ग्रामस्थांना दिली.