अकोला : सर्वत्र आढळून येणारा साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. भारतीय संस्कृतीत सापाला मानाचे स्थान असून, नागपंचमीला सापाचे पूजन करण्याची परंपराही आपल्याकडे आहे. तथापि, केवळ नागपंचमीला पुजायचे व इतर दिवशी दिसताच सापाला मारायचे, असे चित्र सगळीकडेच दिसून येते. जंगल, ओसाड जमीन, पडकी घरे आदी ठिकाणी अधिवास करून राहत असलेल्या सापांबाबत जनसामान्यात अनेक गैरसमज आहेत. सर्वच साप विषारी आहेत, असे समजून साप दिसताच त्याला मारण्याची प्रवृत्ती सगळीकडेच आहे. साप हा थंड रक्ताचा सरपटणारा प्राणी असून बहुतांश साप निरुपद्रवी असतात. परंतु, केवळ गैरसमजापोटी साप मारले जातात. सापांबाबत अज्ञान व भीतीपोटी हे प्रकार होत असल्याने सापांविषयी माहिती करून घेण्याचे आवाहन सर्पमित्रांकडून करण्यात येते.
जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार
विषारी : नाग, मण्यार, घोणस, फुरसे, मांजऱ्या, हरणटोळ
बिन विषारी : अजगर, धामण, पानदिवड, कवड्या, मांडुळ, डुरक्या घोणस, कुकरी, वाळा, नानेटी
साप हा तर शेतकऱ्याचा मित्र
सापाचे प्रमुख खाद्य म्हणजे उंदीर, घुशी व इतर छोटे प्राणी. उंदीर व घुशी हे दरवर्षी लाखो रुपयांच्या धान्यांची नासाडी करतात. धान्याच्या कोठारांमध्ये आढळणाऱ्या उंदीर व घुशींचा सापांकडून मोठ्या प्रमाणात सफाया केला जातो. शिवाय शेतांमध्ये पिकांची मुळे पोखरणारे छोटे प्राणीही साप फस्त करतो. त्यामुळे साप हा एक प्रकारे शेतकऱ्याचा मित्रच ठरतो.
साप आढळला तर...
साप घरात आढळल्यास त्यावर दुरूनच लक्ष ठेवावे. त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. साप छोटा असला तरी त्याला हात लावू नये.
साप हा छोटा आहे की मोठा हे महत्त्वाचे नसून तो विषारी की बिनविषारी हे महत्त्वाचे असते. साप छोटा असल्यास त्यावर कापड टाकावे जेणेकरून तो एकाच ठिकाणी राहील.
साप आढळल्याची माहिती तत्काळ जवळच्या सर्पमित्र किंवा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना द्यावी. त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये.
सर्पमित्र काय म्हणतात...
सापांबाबत बरेच गैरसमज आहेत. सर्वच साप विषारी नसतात. घरात साप आढळल्यास त्याला मारण्याची प्रवृत्ती असते. परंतु, तसे न करता सर्पमित्रास कळविले पाहिजे.
- बाळ काळणे, सर्पमित्र व मानद वन्यजीव रक्षक, अकोला