अकोला: महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाचे आतापर्यंत ६० टक्के सोयाबीन बियाणे बाजारात पोहोचले आहे. ३० टक्के मूग, उडीद बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मात्र सोयाबीन बियाणे हवे आहे. येत्या मेअखेर सर्व बियाणे बाजारात उपलब्ध करण्यात येणार असल्याचे महाबीजचे म्हणणे आहे.गतवर्षीचा पावसाचा फटका सोयाबीन पिकाला बसल्याने हेक्टरी उतारा कमी लागला आहे. पावसाने बियाणे काळे पडले आहे. यामुळे राज्यात यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरचे बियाणे पेरणीसाठी वापरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यामुळे कृषी विभागासह शेतकºयांची चिंता वाढली आहे. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३८ लाख हेक्टर आहे. महाबीजकडे चार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. ज्यात जवळपास ८ ते ९ लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे. बियाणे कंपन्या किती बियाणे उपलब्ध करतात, यावर अवलंबून आहे. बियाणे उपलब्ध झाले तरी त्याची उगवण क्षमता किती, हे तपासावे लागणार आहे. सध्या तापमान वाढल्याने सोयाबीन बियाणे उगवण क्षमता ७० हून ६५ टक्क्यांपर्यंत आली आहे. सद्यस्थितीत ६० टक्के बियाणे महाबीजने उपलब्ध केले. दरम्यान, सोयाबीन बियाण्याची कमतरता भासत असल्याने यावर्षी महाबीजने २५ हजार क्विंटल बियाणे बाहेरून खरेदी करण्यासाठीची निविदा मागविली आहे; पण हे बियाणे अद्याप महाबीजकडे पोहोचले नाही. यावर्षी महाबीजने सोयाबीनचे दर तीन ते चार टक्के वाढविले आहे. आतापर्यंत ६० टक्के सोयाबीन बियाणे बाजारात उपलब्ध केले असून, वाहतुकीचा प्रश्न असल्याने अगोदर बाहेरच्या गावांना बियाणे पाठविण्यात आले आहे. मेअखेर सर्व बियाण्याचा पुरवठा होईल.-अजय कुचे, महाव्यवस्थापक (विपणन) महाबीज, अकोला.