- अतुल जयस्वाल
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत राज्यात वर्ष २०२१-२२ करीता बिगर आदिवासी क्षेत्रांमध्ये नर्सिंग कार्यक्रमासाठी केंद्र शासनाकडे प्रस्तावित करण्यात आलेल्या ३२०७ एएनएम पदांपैकी ५९७ पदांना मंजुरी व वेतन न मिळाल्याने ही पदे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक ३९ पदे ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
केंद्राकडून मान्यता न मिळालेली पदे रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक यांच्या कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून, या सूचनांनुसार प्रत्येक जिल्ह्यातील मंजुरी न मिळालेली पदे ३१ ऑगस्टपूर्वीच रद्द करावयाची आहेत. सर्वात आधी जिल्हा पातळीवरील रिक्त पदे रद्द करावयाची असून, त्यानंतरही रद्द करावयाची पदे शिल्लक असल्यास गत वर्षभरापासून एकही बाळंतपण न झालेल्या आरोग्य उपकेंद्रांमधील पदे रद्द करण्यात येणार आहेत.
नागरी आरोग्य अभियानात संधी
रद्द झालेल्या पदावरील एएनएमना राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करायची इच्छा असल्यास त्यांना तसा अर्ज उपसंचालक, आरोग्य सेवा मंडळ यांच्याकडे करता येणार आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानअंतर्गत पदे रिक्त असल्यास उपसंचालक त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती देऊ शकतात.