मास्कची निर्धारित दरांपेक्षा अधिक दराने विक्री न करण्याचा इशारा
एफडीएच्या सहायक आयुक्तांनी दिले निर्देश
सचिन राऊत
अकोला : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी अत्यावश्यक असलेल्या मास्कची राज्यातील औषध दुकानदार अधिक दराने विक्री करीत असल्याच्या तक्रारी झाल्यानंतर शासनाने मास्कचे दर निश्चित केले. मात्र या दरापेक्षा अधिक दराने मास्कची अधिक दराने विक्री केल्यास औषधी दुकानांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यातील औषधी दुकानदारांना तशा प्रकारचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत.
कोविड संसर्गाचा प्रतिबंधसाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कच्या किमती शासनाने निर्धारित केल्या आहेत. नागरिकांनी मास्क खरेदी करताना या निर्धारित दरांनुसारच करावी, तसेच दुकानदारांनीही मास्कची विक्री करताना निर्धारित दराने करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील काही औषधी दुकानदार मास्कची चढ्या दराने विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आलेल्या आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त व्ही. बी. सुलोचने यांनी जिल्ह्यातील औषधी दुकानदार यांना सूचना देत मास्कची निर्धारित दरानुसार विक्री करण्याचे सांगितले आहे.
दरपत्रक दर्शनी भागात लावा
मास्कच्या दरांची माहिती दुकानाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील एकही औषध दुकानात दरपत्रक नसल्याचे वास्तव आहे.
शासनाने निर्धारित केलेले प्रति मास्क दर - एन ९५ व्ही आकार-१९ रुपये, एन ९५ ३-डी-२५ रुपये, एन ९५ व्हॉल्व्हरहित-२८ रुपये, मॅग्नम एन ९५ कप आकार- ४९ रुपये, व्हिनस सीएन ९५, एन ९५ कप आकार- २९ रुपये, व्हिनस सीएन ९५, एन ९५ कप आकार व्हॉल्व्हरहित-३७, व्हिनस सीएन ९५, एन ९५ ६ आरई-कप आकार व्हॉल्व्हरहित- २९ रुपये, एफएफपी मास्क- १२ रुपये, २-प्लाय सर्जिकल मास्क दोरीसह- तीन रुपये, ३-प्लाय सर्जिकल मास्क – चार रुपये, डॉक्टर किट-१२७ रुपये.
नागरिकांनी निश्चित केलेल्या दरांप्रमाणे मास्कची खरेदी करावी. जे दुकानदार या दरात मास्क विक्री करणार नाहीत त्यांची तक्रार बिलासह अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करा. अशा दुकानावर कारवाई होणार हे निश्चित.
व्ही. बी. सुलोचने
सहायक आयुक्त
अन्न व औषध प्रशासन विभाग, अकोला