अकोला: शहरवासीयांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत असून बोअर, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जल पुनर्भरणाची (रेन वॉटर हार्वेस्टिंग)गरज निर्माण झाली आहे. यासंदर्भात माहिती देण्याकरिता महापालिकेत कक्षाचे गठन करण्यासोबतच शहरातील ओपन स्पेसवर शोषखड्डे करण्याला प्रशासन प्राधान्य देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली, तसेच भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अकोलेकरांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी समोर येण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.महान धरणात उपलब्ध असलेला जलसाठा व अकोला शहराच्या भूजल पातळीत घसरण झाल्यामुळे अकोलेकरांना काही अंशी पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे. भूजल पातळीत वाढ करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग)करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच प्रत्यक्षात कृती करण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाने पुढाकार घेत गुरुवारी सायंकाळी मनपाच्या मुख्य सभागृहात कार्यशाळेचे आयोजन केले होते. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने पावसाचे पाणी जमिनीत न मुरता नाल्यांद्वारे वाहून जात असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे शहराच्या भूजल पातळीत घसरण होत आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी मनपा प्रशासनाने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मृद व जलसंधारण विभागाचे विभाग प्रमुख डॉ.सुभाष टाले, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक बरडे यांना निमंत्रित केले होते. यावेळी डॉ.सुभाष टाले यांनी भूजल पातळीत घसरण झाल्याचे सांगत पाण्याचा बेसुमार उपसा व वापर होत असल्याचे नमूद करीत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनीच जागरूक होण्याची गरज असल्याचे सांगितले. छतावरील पाण्याचे नियोजन करून ते बोअर किंवा विहिरीपर्यंत कसे पोहोचवता येईल, याबद्दल डॉ.सुभाष टाले यांनी उपस्थिताना सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, उप-महापौर वैशाली शेळके, नगरसेविका सुमनताई गावंडे, उषा विरक, योगिता पावसाळे, नंदा पाटील, मंगला सोनोने, जान्हवी डोंगरे, आम्रपाली उपरवट, रंजना विंचनकर, जयश्री दुबे, नगरसेवक हरीश आलीमचंदानी, बाळ टाले,आशिष पवित्रकार, डॉ.जिशान हुसेन, मिलिंद राऊत, अनिल मुरूमकार, अमोल गोगे, संतोष शेगोकार, हरीश काळे, दीप मनवानी, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, शहर अभियंता इकबाल खान, आर्किटेक्ट असोसिएशन, के्रडाई असोसिएशन तसेच जलप्रदाय विभागातील कर्मचारी उपस्थित होते.--फोटो- २५ सीटीसीएल- ४७--