अकोला: संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी महापालिका क्षेत्रात मनपा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यादरम्यान, समाजातील अत्यंत गरजू नागरिकांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.ही बाब ध्यानात घेता संबंधितांना अन्नधान्य, जेवण देण्याकरिता शहरातील विविध सामाजिक स्वयंसेवी संघटना व स्वयंसेवक सरसावले आहेत; परंतु कोरोना विषाणू संसर्गजन्य आजार असल्याने सामाजिक संघटना, स्वयंसेवकांची गर्दी टाळण्याच्या उद्देशातून मनपा प्रशासनाने मनपात सोशल सेलचे गठन केले आहे. या सेलच्या माध्यमातून प्रशासनाच्यावतीने गरजू व्यक्तींपर्यंत अन्नधान्यासह इतर मदत घरपोच दिली जाणार आहे.जीवघेण्या कोरोना विषाणूने देशात हात-पाय पसरण्यास सुरुवात केली असून, महाराष्ट्रात या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. धोक्याची घंटा लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी संपूर्ण देशात पुढील २१ दिवसांकरिता ‘लॉकडाऊन’ घोषित केला. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ मार्च रोजी सायंकाळी राज्यात जमावबंदीचा आदेश लागू केल्यानंतर तातडीने २३ मार्च रोजी संचारबंदी लागू केली. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी केंद्र शासन असो वा राज्य शासनाच्या स्तरावर प्रभावीपणे उपाययोजना केल्या जात असल्या तरी सर्वसामान्य नागरिकांच्या स्तरावर कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. यादरम्यान, ‘लॉकडाऊन’मुळे गरजू नागरिकांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे दिसत आहे. साहजिकच, अशा स्थितीत त्यांच्या मदतीसाठी शहरातील स्वयंसेवी सामाजिक संघटना, समाजसेवक सरसावले आहेत; परंतु अशा संघटना, स्वयंसेवकांची वाढती संख्या पाहता व कोरोनाच्या धर्तीवर गर्दी टाळण्याचा उद्देश लक्षात घेता आता महापालिका प्रशासनानेच अशा गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेत ‘सोशल सेल’ची स्थापना करण्यात आली असून, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती, समाजसेवकांना या ‘सोशल सेल’सोबत संपर्क व समन्वय साधण्याचे आवाहन आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे.
पोलीस प्रशासनाकडे साडेपाच हजार अर्जजीवघेण्या कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी 'लॉकडाऊन' करण्यात आले आहे. अर्थात, अशावेळी एकमेकांच्या संपर्कात न येणे, आपसात की मान साडेतीन फूट अंतर राखणे आदी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे शहरात गरजूंना मदत करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे नोंदणी करीत तात्पुरते ओळखपत्र घेण्यासाठी तब्बल साडेपाच हजारपेक्षा अधिक सामाजिक संघटना, स्वयंघोषित समाजसेवकांनी अर्ज सादर केल्याची माहिती आहे. एवढ्या संघटना व समाजसेवकांना ओळखपत्र दिल्यास गर्दीचा धोका वाढून कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे.
मदतीचा प्रस्ताव मनपाकडे द्या!शहरातील बेघर, उघड्यावर वास्तव्य करणारे तसेच झोपडपट्टी भागातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्नधान्य, कपडे, औषधी आदी स्वरूपात मदत करायची असल्यास संबंधित साहित्याची शिस्तबद्धपणे नोंद होण्यासाठी शहरातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना व समाजसेवकांनी मनपा प्रशासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करा. त्यासाठी प्रशासनाने योगेश मारवाडी (7709588222), महेश राऊत (7709043388), पंकज देवळे (9850162539), राजेंद्र देशमुख (7709043155) यांच्यासोबत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.