अकोला : समाजाच्या व्यापक हितासाठी सर्व जाती, धर्माच्या लोकामध्ये सामाजिक एकता, जातीय सलोखा गरजेचे आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी सोमवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
पोलीस विभागातर्फे राणी महल लाॅनमध्ये जातीय सलोखा सप्ताहाचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, मुफ्ती-ए-बरार मौलाना अब्दुल रशीद, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून अकोला पोलीस विभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. १४ ते २६ जूनपर्यंत जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशनांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या सप्ताहात रक्तदान, वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचलन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले. यावेळी विविध पोलीस स्टेशनचे शांतता समितीचे सदस्य, पोलीस अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते. शांतता समितीचे सदस्य प्रा.मोहन खडसे, शेख हसन कादरी यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमात सामाजिक एकतेची शपथ घेण्यात आली.