अकोला: समाजकल्याण विभागामार्फत २०२१-२२ या आर्थिक वर्षात विविध योजना राबविण्यासाठी ११ कोटी ६५ लाख रुपयांचे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत सोमवारी मंजूर करण्यात आले.
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे २०२०-२१ या आर्थिक वर्षातील सुधारित अंदाजपत्रकासह २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे मूळ अर्थसंकल्पीय अंदापत्रक मंजूर करण्यात आले. ११ कोटी ६५ लाख रुपयांच्या मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांच्या निधीतून दुधाळ जनावरे वाटपाची योजना, ५० लाख रुपयांच्या निधीतून दिव्यांगांसाठी उद्योग योजना व अन्य योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत २०१८ ते २०२३ च्या बृहद आराखड्यात मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत पुनर्वसित ग्रामपंचायत पोही येथील वस्त्यांचा समावेश करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. समाजकल्याण समितीच्या मागील सभेचे इतिवृत्त सभेत मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य गजानन डाफे, कोमल पेटे, सुमन गावंडे, माया नाईक, नीता गवई, आम्रपाली खंडारे, वंदना झळके, बाळापूर पंचायत समितीचे सभापती प्रकाश वाहुरवाघ यांच्यासह समाजकल्याण अधिकारी रामेश्वर वसतकार उपस्थित होते.
दुधाळ जनावरे वाटपासाठी
९५ लाभार्थींची यादी जाहीर करणार!
जिल्हा परिषद उपकर निधीतून २०२०-२१ या आर्थिक वर्षात समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून ९५ लाभार्थींना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यासाठी लाभार्थींची निवड सभेत अंतिम करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या ९५ लाभार्थींची यादी दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचे सभापती आकाश शिरसाट यांनी सांगितले.