अकोला : कोरोना काळात इंडियन रेड क्रॉस संस्थेच्या माध्यमातून होमिओपॅथिक डॉक्टरांनी प्रतिबंधात्मक औषधांचे वितरण केले. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे नागरिकांना फायदा झाला. भविष्यातही शासन व संस्थेला मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.
होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त शहरातील होमिओपॅथिक तज्ज्ञांचा इंडियन रेड क्रॉस सोसायटी व जागतिक होमिओपॅथिक दिवस उत्सव समितीतर्फे आयोजित सत्कार प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर किशोर मालोकार, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. तिलकराज सरनाईक, अकोला होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय तिवारी, डॉ. संदीप चव्हाण, डॉ. योगिता चव्हाण, डॉ. सत्यजीत कुचर, डॉ. अमोल कुचर, डॉ. कल्पना धोटे, डॉ. शिवशंकर मौर्य, यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी निमा अरोरा यांच्याहस्ते डॉक्टर हॅनेमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रास्ताविक डॉ. किशोर मालोकार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन इंडियन रेडक्रॉसचे मानद सचिव प्रभजितसिंह बछेर यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. संदीप चव्हाण यांनी केले.