अकोला: शाश्वत उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता टिकविणे आवश्यक आहे. पिकांना विविध प्रकारच्या १७ अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात गरज असते. मातीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी या अन्नद्रव्यांचे महत्त्व लक्षात घेता जमिनीची आरोग्य पत्रिकाच तयार करण्याचा निर्णय भारतीय कृषी संशोधन परिषद, महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद आणि कृषी विज्ञान केंद्राने घेतला आहे. हवा, पाणी व जमितीतून पिके अन्नद्रव्य शोषून घेतात. भरघोस उत्पादनासाठी नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांची गरज आहे. इतर अन्नद्रव्यांच्या तुलनेत या तीन घटकांचे महत्त्व जमितीच्या सुपिकतेच्या दृष्टीने अधिक आहे. ही अन्नद्रव्ये पिकांना मिळावी म्हणून सेंद्रिय किंवा रासायनिक खत दिले जाते. पिकांना अन्नद्रव्यांची गरज किती, हे जमितीच्या सुपिकतेवर अवलंबून असते. त्यानुसार खताचे प्रमाण ठरविले जाते. अधिक उत्पादन मिळविण्याच्या दृष्टिकोनातून मातीचे परीक्षण करून जमिनीतील विद्राव्य क्षार तसेच अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेणे आवश्यक आहे. काळाची गरज लक्षात घेता मातीची सुपिकता आणि आरोग्य टिकवून ठेवण्याचे महत्त्व अधिक आहे. त्यासाठी मृदा आरोग्य पत्रिका तयार करण्याची योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी संशोधन परिषदेसोबत कृषी विज्ञान केंद्राने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे डॉ. राजेंद्र काटकर, रोशन गोरे, डॉ. बी.ए. सोनुने, प्रा. डी.बी. तामगाडगे आदींनी काम सुरू केले असून, मृदा आरोग्य पत्रिका तयार करण्याच्या दृष्टिकोनातून शास्त्रोक्त अभ्यास केला जात आहे.
*मृद आरोग्य पत्रिका म्हणजे काय?
मातीच्या सुपिकतेसंबंधी अडचणी तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यामधून मातीचा नमुना काढण्याकरिता असलेल्या उत्कृष्ट पद्धती शोधून त्यांचे परीक्षण करणे आणि खत व्यवस्थापन करणे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पिकांची अन्नद्रव्य उचल करण्याची क्षमता वाढविण्याकरिता माती परीक्षण करून अन्नद्रव्य व्यवस्थापनात सुधारणा करणे. जिलतील शेतकरी, राज्य शासनाचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसेच प्रगतिशील शेतकरी यांच्यात अन्नद्रव्य व्यवस्थापनासंबंधी बांधणी करणे. प्रत्येक शेतक-याला मिळणार आरोग्य पत्रिका मातीतील अन्नद्रव्यांची कमतरता पाहून जमिनीची आरोग्य पत्रिका तयार केली जाणार आहे. त्यात मातील सर्व घटकांची माहिती राहणार असून, कोणते खत किती प्रमाणात देण्याची गरज आहे, याची माहिती आहे. ही तयारी झालेली मृदा आरोग्य पत्रिका राज्यातील प्रत्येक शेतकर्याला वाटप केली जाईल.