अकोला : पीक व खतांचे योग्य नियोजन करू न, अन्नधान्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी मातीच्या मगदुरानुसार शेती करण्याची गरज असून, याकरिता यावर्षी प्रत्यक्ष शेतावर जाऊन माती परीक्षणाचे नमुने घेण्यात आले आहेत. याकरिता मानव विकास मिशनद्वारे राज्यासह विदर्भातील कृषी विज्ञान केंद्रांना (केव्हीके) फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध करू न देण्यात आली आहे; पण भारतीय कृषी संशोधन परिषदेची (आयसीएआर) विदर्भाला एकच फिरती प्रयोगशाळा उपलब्ध करू न देण्यात आली असून, आयसीएआरकडून आणखी फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा मिळणार असल्याचे वृत्त आहे. विभागानुसार मातीचा मगदूर, गुणधर्म बदलत असल्याने सर्वच भागात एकसारखी पिके घेता येत नाहीत. पश्चिम विदर्भातील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील जमीन काळी आणि भारी आहे; परंतु अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील जमिनीचा काही भाग हलका आहे, तर खारपाणपट्टय़ातील जमिनी चोपन आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांसह शेतकर्यांनासुद्धा पीक व खतांचे नियोजन करणे अवघड झाले आहे. दुसरीकडे उत्पादनात मात्र घट होत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करू न जमिनीचा पोत सुधारण्याची गरज असल्याने माती परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे जमिनीचे गुणधर्म बदललेले असताना, दुसरीकडे शेतात नायट्रोजन, युरियाचा वापर भरमसाट वाढला आहे. परिणामी जमिनीचा पोत आणखी खराब झाला असून, उत्पादनातील घट हे त्याचेच प्रमुख कारण आहे. म्हणूनच चांगले अन्न आणि चांगली शेतजमीन निर्माण करण्यासाठी संशोधनाची नवी दिशा ठरविताना सुरुवातीला माती परीक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.त्यासाठीच जिल्हा तिथे माती परीक्षण प्रयोगशाळा असावी, असा आयसीएआरचा संकल्प आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला एक फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा मिळाली आहे; पण ही प्रयोगशाळा संपूर्ण विदर्भात पोहचू शकत नसल्याने नव्याने फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध करू न देण्याची गरज आहे.
फिरते माती परीक्षणात ‘केव्हीके’चा सहभाग वाढला!
By admin | Published: June 22, 2015 2:16 AM