राजरत्न सिरसाट/अकोलामाती परिक्षणाच्या पारंपरिक वेळखाऊ पद्धतीवर अमेरिकेने मात केली असून, उपग्रहाद्वारे अवघ्या साठ सेकंदांत परिपूर्ण अहवाल देणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. शेतकर्यांना शेतातील मातीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, याचा ताळमेळ बसवून हमखास उत्पादन घेता यावे, यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विदर्भात करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत करार केला जाणार असल्याची माहिती अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठातील या तंत्रज्ञानाचे जनक तथा कृषी विज्ञान आणि नैसर्गिक संसाधन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता (संशोधन) डॉ. डेव्हिड सी. विनडॉर्फ यांनी खास लोकमतशी बोलताना दिली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी परिसंवादाला उपस्थित राहण्यासाठी डॉ. विनडॉर्फ अकोला येथे आले आहेत. याप्रसंगी माती परिक्षणाशिवाय शेती करू च नये, असे त्यांनी आर्वजून सांगितले.प्रश्न- काय आहे माती परिक्षणाचे नवीन तंत्रज्ञान? - माती परिक्षणाचे हे एक्सआरएफ तंत्रज्ञान आहे. मातीचा प्रत्यक्ष नमुना न घेता, त्यामध्ये कोणते मूलद्रव्य कमी आहेत, हे केवळ साठ सेकंदांत सांगता येते आणि तीन तासांत जवळपास १८0 मातीचे नमुने या तंत्रज्ञानाने काढण्यात येतात.प्रश्न - शेतात प्रामुख्याने कोणत्या घटकांची कमतरता आढळते?- प्रामुख्याने शेतातील गंधक, जीप्सम आदी सर्वच घटकांसह प्रमुख व दुय्यम अन्नद्रव्ये शोधली जातात.प्रश्न- माती परिक्षण करणे गरजेचे आहे का ?- होय, माती परिक्षण केले, तर मातीचा सामू कळतो. मातीत कोणते गुणधर्म कमी आहेत, हे समजते आणि त्या उपाययोजना करू न कोणती खते वापरावीत, याचे नियोजन करता येते. त्यामुळे योग्य ते उत्पादन घेण्याचा मार्ग मोकळा होतो. प्रश्न- हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी किती कालावधी लागला ?- माती परिक्षणाचे तंत्रज्ञान आधीपासूनच होते. नवीन संशोधन जवळपास वीस वर्षांपूर्वी झाले होते. यात आता नवे संशोधन करण्यात आले असून, त्यामुळे साठ सेकंदांत माती परिक्षणाचा अहवाल देण्याची सोय झाली आहे. प्रश्न- जलतपासणीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो का ?- होय, जलतपासणीसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची शुद्धता तपासली जाते. पाण्यात कोणती जड तत्त्वे, जलप्रदूषक आहेत, हे लगेच कळते. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होत असल्याने या तंत्रज्ञानाचा अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे.
..आता सेकंदात माती परीक्षण !
By admin | Published: December 05, 2014 11:54 PM