मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम चिखली येथे रिलायन्स फाऊंडेशन व इफको यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उमेद’च्या बचत गटातील महिलांसाठी माती परीक्षण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शास्त्रज्ञ पवन आडे उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमात माती परीक्षणाविषयीचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
शेतकऱ्याने जमिनीचे माती परीक्षण करुन त्याच्या तपासणी अहवालानुसार येणाऱ्या शिफारशीप्रमाणे खतांचा वापर करावा तसेच माती परीक्षणाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कोणती पिके घ्यावी, शिफारशीनुसार खतांची मात्रा किती प्रमाणात द्यावी, नत्र, स्फुरद, पालाशची कमतरता असेल तर काय करावे, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असेल तर कसे नियोजन करावे, गांडूळ खत, सेंद्रिय खत ,हिरवळीचे खत किती द्यावे, आदींबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)च्या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात मातीचे २०० नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यावेळी तालुका प्रभाग समन्वयक इंदुरकर, प्रभाग समन्वयक रूपाली येवले, कृषी सखी, पशू सखी उपस्थित होत्या. (फोटो)