अकोला : कपाशी पिकावरील बोंडअळीवर प्रभावी उपाय म्हणून आता सौर ऊर्जेवर चालणारी कीटक सापळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने विकसित केली आहेत. या सापळ्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता कृषी विद्यापीठाने एका खासगी कंपनीसोबत शुक्रवार, ३१ आॅगस्ट रोजी सामंजस्य करार केला.सोलर लाइट इन्सेक्ट ट्रॅप व पंदेकृवि सौर नॅपसॅक स्पे्रअर असे या कीटक सापळ्याचे नाव आहे. हे तंत्रज्ञान कपाशीवरील बोंडअळी नियंत्रणासाठी उपयुक्त असून, या सापळ्याचा कपाशीच्या शेतात केल्यास किडीवर नियंत्रण मिळविता येते, तसेच या तंत्रज्ञानाचा वापर सेंद्रिय शेती पद्धतीत करू न जैविक कीड नियंत्रण करता येणे शक्य असल्याचा दावा कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी केला. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात बोंडअळीने कपाशीचे नुकसान केल्याने बोंडअळी नियंत्रणाचे मोठे आव्हान होते. यानुषंगाने कृषी विद्यापीठाने सौर ऊर्जेवर चालणारी कीटक सापळे विकसित केले असून, प्रत्येक शेतकºयाला हे तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, याकरिता सामंजस्य करार करण्यात येत असल्याचे याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले. विनाविजेवर चालणारी ही सापळे असल्याने शेतकºयांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.त्यावेळी कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन प्रा. विवेक खांबलकर, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, विद्या पवार, डॉ. एम. बी. नागदेवे आदींची उपस्थिती होती.