अकोला: आगामी काळात अत्याधुनिक उपकरणांना अक्षय्य ऊर्जा स्रोत म्हणून सौर ऊर्जेचा वापर केल्यास संशोधन सक्षम होण्यासोबतच हरित ऊर्जासंपन्न होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक व संशोधन संस्थांनी पुढे येणे हि काळाची गरज असल्याचे मत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर चे कुलगुरू कर्नल प्रा. डॉ. आशिष पातुरकर यांनी व्यक्त केले. स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथे सौर ऊर्जा संचालित पशुप्रजनन विभागाच्या अत्याधुनिक भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान प्रयोगशाळेस भेट व उद्घाटन प्रसंगी डॉ. पातूरकर बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने, प्रकल्प प्रमुख तथा चिकित्सालयीन अधीक्षक प्रा. डॉ. सुनील वाघमारे व प्रा डॉ मिलिंद थोरात, विभागप्रमुख प्रा. डॉ. चैतन्य पावशे यांचेसह डॉ. किशोर पजई, डॉ. रत्नाकर राऊळकर, डॉ. महेश इंगवले, डॉ. श्याम देशमुख आणि प्रा. डॉ. शैलेंद्र कुरळकर उपस्थित होते.
दरम्यान मा. कुलगुरू महोदयांनी शैक्षणिक पशुवैद्यकीय चिकित्सालय संकुलात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारलेल्या अत्याधुनिक 'लहान जनावरांचे शस्त्रक्रिया गृह' आणि 'रोगनिदान प्रयोगशाळा' आदींचेही उदघाटन केले आणि पशुधनास उत्तम आरोग्य सेवा देण्याकरिता रोगनिदान प्रयोगशाळेचे बळकटीकरण केल्याप्रित्यर्थ समाधान व्यक्त केले. याप्रसंगी प्रकल्प प्रमुख तथा चिकित्सालयीन अधीक्षक प्रा. डॉ. सुनील वाघमारे व प्रा डॉ मिलिंद थोरात यांचेसह डॉ. किशोर पजई, डॉ. रत्नाकर राऊळकर, डॉ. महेश इंगवले, डॉ. श्याम देशमुख आणि प्रा. डॉ. शैलेंद्र कुरळकर उपस्थित होते. मा कुलगुरू महोदयानी नवीन पदवीपूर्व पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसंबंधीत नोडल अधिकारी प्रा. डॉ. थोरात यांचेसह चर्चा केली. राष्ट्रीय कृषि विकास योजना,भारतीय कृषी अनुसंधान केंद्र, नवी दिल्ली तसेच विद्यापीठ अनुदानातून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामासंबंधीची माहिती डॉ वाघमारे, डॉ. प्रशांत कपले आणि डॉ. रणजित इंगोले यांनी सादर केली. कुक्कुटपालन, पूर्णाथडी म्हैस, चारापिके इत्यादी प्रक्षेत्रांना भेटीदरम्यान प्रा. डॉ. सतीश मनवर, डॉ दिलीप बदुकले, डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. मंगेश वडे व डॉ. कुलदीप देशपांडे यांचेसह चर्चा आणि मार्गदर्शन केले. त्याचबरोबर राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषदेच्या संकलित निधीतून उभारण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या कामकाजाबद्दल डॉ. प्रवीण बनकर यांनी माहिती दिली.
दरम्यान मा. कुलगुरू महोदयांनी श्री. नरेश देशमुख, संचालक, गोट बँक ऑफ कारखेडा जिल्हा अकोला यांचेसह चर्चा करत प्रकल्प समजून घेतला व प्रकल्पाच्या पुढील प्रगती साठी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. भिकाने यांनी संस्थाप्रमुख या नात्याने मा. कुलगुरू महोदयांचे कृतज्ञतापूर्वक स्वागत केले व लॉकडाऊन कालावधीत ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, राष्ट्रीय कार्यशाळा/ परिषद, राज्यस्तरीय प्रशिक्षणे आणि वेबिनार इत्यादीचा अहवाल सादर केला. कुलगुरू महोदयांनी याप्रसंगी पशुऔषधोपचार विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाच्या स्मरणिकेचे विमोचन करत आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संस्थेच्या आणि विद्यापीठाच्या विकासात अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण बनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. आनंद रत्नपारखी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व सौर उर्जानिर्मिती प्रकल्प उभारणीसाठी श्री जंयत फाटे यानी सहकार्य केले.