राम देशपांडे / अकोला: वीज बचतीसह रेल्वे स्थानकांच्या वीज बिलात कपात करण्याच्या दृष्टिकोणातून मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव व मलकापूर रेल्वे स्थानकांवर विद्युतीकरणासाठी प्रत्येकी २५ किलो व्हॅटचे सोलर प्लान्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून मंडळ प्रशासनाने भुसावळ येथील रेल्वे प्रशिक्षण संस्था व नाशिक रोड रेल्वे स्थानकाला वीज पुरवठा करणारे प्रत्येकी ५0 किलो व्हॅटचे सोलर प्लाण्ट उभारणार असल्याची माहिती मंडळ अधिकार्यांनी सोमवारी दिली. नावाप्रमाणेच व्याप्ती असलेल्या भारतीय रेल्वे प्रशासनाला प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या विद्युतीकरणासाठी सर्वसामान्य औद्योगिक संस्थांप्रमाणे वीज बिल अदा करावे लागते. रेल्वेस्थानकांवरील प्रकाश व्यवस्था व इतर विद्युत उपकरणे चालविण्यासाठी रेल्वे प्रशासनाला महावितरणकडून वीज खरेदी करावी लागते. विद्युतीकरणावर होणारा खर्च प्रत्येक रेल्वेस्थानकाच्या स्थानिक प्रशासनाद्वारे केला जातो. महावितरणकडून औद्योगिक दराने आकारल्या जाणार्या विद्युत बिलात कपात व्हावी, यासाठी मंडळातील बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव आणि मलकापूर या प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रत्येकी २५ किलो व्हॅटचे सोलर प्लाण्ट उभारण्यात येणार आहेत. मंडळ प्रशासनाला भुसावळ येथील रेल्वे प्रशिक्षण संस्थेच्या विद्युतीकरणावर मोठय़ा प्रमाणात खर्च करावा लागत होता. या उपक्रमाचा श्रीगणेशा म्हणून दरमहा कोटींच्या घरात असलेला हा विद्युत खर्च कमी करण्यासाठी मंडळ प्रशासनाने रेल्वे प्रशिक्षण संस्थेला विद्युत पुरवठा करण्यासाठी त्याठिकाणी ५0 किलो व्हॅटचा सोलर प्लान्ट उभारला. नाशिक रोड रेल्वे स्थानकाला विद्युत पुरवठा करण्यासाठीसुद्धा मंडळ प्रशासनाने ५0 किलो व्हॅटचा सोलर प्लाण्ट उभारला आहे. लवकरच बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव व मलकापूर रेल्वे स्थानकांच्या विद्युत बिलात कपात करण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर २५ किलो व्हॅटचे सोलर प्लाण्ट उभारण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे भुसावळ मंडळ अधिकारी आर. एस. पाटील यांनी दिली.
रेल्वे स्थानकांवर उभारणार सोलर प्लान्ट!
By admin | Published: February 16, 2016 1:08 AM