अकोला: विद्यार्थ्यांना सौर उर्जेचे महत्त्व कळावे आणि सौर उर्जेचा उपयोग करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी. या दृष्टिकोनातून गांधी जागतिक सौर यात्रा, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदासुद्धा सौरदूत कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ आॅक्टोबर जयंतीदिनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्वत: सौर दिवा तयार करावा लागणार आहे.महात्मा गांधी यांच्या १५0 व्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी गतवर्षीप्रमाणे यंदासुद्धा गांधी जागतिक सौर यात्रा काढण्यात येणार आहे. देशातील भावी पिढीला हवामान बदलाबाबत संवेदनशील बनविण्यासाठी आणि नवीकरणीय उर्जास्रोतांचे दूत बनवून पर्यावरण संवर्धन व संरक्षणामध्ये सहभाग वाढविण्यासाठी हा उपक्रम आहे. राज्यामधील सर्वच शाळांमध्ये २ आॅक्टोबर रोजी विद्यार्थी सौरदूत कार्यशाळा आयोजित करून कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी एटीटीपीएस:/डब्लूडब्लूडब्लू.जीजीएसवाय.इन/कोलाबोरेट.पीएचपी या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी शाळा नोंदणीनंतर याच संकेतस्थळावर शिक्षकांचे नामनिर्देशनही करावे लागणार आहे. त्यासाठी शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सौर दिवा बनविण्यासाठी मार्गदर्शनकार्यशाळेसाठी सौर दिवा संच आवश्यक असून, त्यांची अंदाजे किंमत ५00 ते ५३0 रुपये आहे. या संचाचा वापर करून तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सौर दिवा तयार करून घ्यावयाचा आहे. सौरदूत म्हणून सहभागी होण्यासाठी प्रत्येक शाळेतील ११ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ५0 विद्यार्थ्यांना सहभागी करावे. या विद्यार्थी व शिक्षकांना भारतीय तंत्रज्ञान संस्थेतर्फे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.