अकाेला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका व्यापाऱ्याने अकाेली खुर्द परिसरातील डुप्लेक्स एकदा विक्री केल्यानंतर आणखी दाेन जणांना साेबत घेऊन त्याच डुप्लेक्सचे बनावट दस्तावेज तयार केले़ त्यानंतर हाच डुप्लेक्स युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत गहाण देऊन बॅंकेला तब्बल ३६ लाख ४१ हजार रुपयांनी गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़. या प्रकरणाची तक्रार बॅंकेचे व्यवस्थापक यांनी रामदास पेठ पाेलीस ठाण्यात केली असून पाेलिसांनी चाैकशी सुरू केली आहे़. जुने शहरातील जाेगळेकर प्लाॅट येथील रहिवासी माेहम्मद सफवान जावेद इक्बाल वय ४५ वर्ष, बाळापूर तालुक्यातील कसारखेड येथील रहिवासी रियाज खान युसुफ खान व शाहीस्ता परवीन रियाज खान या तिघांनी आकाेली खुर्द येथील रुपचंद नगरमध्ये असलेल्या १९०६ स्क्वेअर फुटाच्या डुप्लेक्सचे बनावट दस्तावेज तयार केले़. त्यानंतर या दस्तावेजाच्या आधारे युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतून तब्बल ३३ लाख १० रुपयांचे कर्ज घेतले़. ही रक्कम माेहम्मद सफवान यांच्या खात्यात जमा झाली़ मात्र त्यानंतर या रकमेची परतफेड न झाल्याने हा प्रकार उघडकीस आला़ बॅंक प्रशासनाने या खात्याची तपासणी करून कर्जाची परतफेड हाेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर चाैकशी सुरू केली़. तर ही संपत्ती दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे बॅंकेत ज्या व्यक्तींनी ही संपत्ती गहाण दिली़ त्यांनी बॅंकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची तक्रार बॅंकेचे व्यवस्थापक अरुणकुमार छत्रपाल सिंह यांनी दिली़. यावरून पाेलिसांनी माेहम्मद सफवान जावेद इक्बाल, रियाज खान युसुफ खान व शाहिस्ता परवीन रियाज खान या तिघांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६७, ४७१ व ३४ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़.
दाेघांना विकली संपत्ती
आकाेली खुर्द येथील रुपचंद नगरमध्ये असलेली ही संपत्ती दाेघांना विकल्याचे बॅंकेच्या तपासणीत समाेर आले़ बॅंकेने या प्रकरणाची चाैकशी पुणे येथील दीपक बत्रा अॅण्ड असाेसिएटस यांच्या माध्यमातून केली असता बॅंकेला दिलेले दस्तावेज बनावट असल्याचे तसेच कर्जदार अपात्र असल्याचे उघडकीस आले़ तसेच ही संपत्ती दाेन वेगवेगळ्या व्यक्तींना विकल्याचेही समाेर आले आहे़