अकाेला : घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली २०१७ पासून नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर घनकचरा बाजूला सारण्यासाठी मनपाने भाडेतत्त्वावर पाेकलॅण्डचा वापर सुरू केला. या चार वर्षात पाेकलॅण्ड चालकाला अदा केलेले काेट्यवधीचे देयक लक्षात घेता आतापर्यंत मनपाच्या मालकीची पाेकलॅण्ड मशीन खरेदी करता आली असती. या सर्व बाबींची मनपा प्रशासनाला जाणीव असतानादेखील खुद्द प्रशासनाकडूनच या विषयांना मंजुरी देण्याचे प्रस्ताव स्थायी समितीसमाेर सादर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला केंद्र व राज्य शासनाकडून ४५ काेटींचा निधी मंजूर झाला असून, प्रकल्प उभारण्यासाठी मनपाने सप्टेंबर २०२०मध्ये निविदा मंजूर करून कंत्राटदाराला कार्यादेश जारी केले. अद्यापपर्यंत प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात का सुरुवात झाली नाही, यावर प्रशासनाने चुप्पी साधली आहे. शहरालगतच्या भाेड येथील १९ एकर इ-क्लास जागेत या प्रकल्पाची पायाभरणी केली जाणार हाेती. मनपातील संबंधित अधिकाऱ्यांचे हेतुपुरस्सरपणे हाेणारे दुर्लक्ष व प्रकल्प अहवालात त्रुटी ठेवणाऱ्या मार्सनामक एजन्सीमुळे महत्त्वकांक्षी प्रकल्पाला खीळ बसल्याचे चित्र समाेर आले आहे. या प्रकल्पातील अडथळे दूर न करता प्रशासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली थातूरमातूर उपाययाेजनांकडे अर्थपूर्ण लक्ष दिले जात आहे. २०१७ पासून नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर साठवणूक केल्या जाणाऱ्या कचऱ्याला केवळ बाजूला सारण्यासाठी मनपाने भाडेतत्त्वावर पाेकलॅण्ड मशीन घेतली आहे. या माेबदल्यात मागील चार वर्षांत मनपाने काेट्यवधी रुपयांचे देयक अदा केले असून, इतक्या माेठ्या रकमेत किमान दाेन पाेकलॅण्ड मशीनची खरेदी करता आली असती.
स्थायी समितीमध्ये मुदतवाढीचा प्रस्ताव
पाेकलॅण्ड मशीनसह भाडेतत्त्वावरील ट्रॅक्टर, चालक व मजूर तसेच सार्वजनिक शाैचालयांच्या साफसफाईचा कंत्राट घेतलेल्या महिला बचतगटांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव १ जून राेजी आयाेजित स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला आहे. यावेळी मानधनावरील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिली जाणार आहे.
ऑनलाइन सभेचे दुपारी आयाेजन
काेराेना विषाणूमुळे शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करीत प्रशासनाकडून स्थायी समितीचे दुपारी १२.३० वाजता ऑनलाइन प्रणालीद्वारे आयाेजन करण्यात आले आहे. १६ सदस्य स्थायी समितीमध्ये विभागप्रमुख उपस्थित असतात. दरम्यान, प्रशासनाने जनता भाजी बाजारातील ५००पेक्षा अधिक व्यावसायिकांची एकाच दिवशी सुनावणी घेतली हाेती, हे येथे उल्लेखनीय.